
परभणी, 23 जून (हिं.स.)। पाथरी विधानसभा मतदारसंघातील ताडबोरगाव ते साळापुरी या ४२ किलोमीटर रस्ता कामासाठी ४२० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली.
मानवत तालुक्यातून सुरू होणाऱ्या प्रमुख राज्य मार्ग क्र. - २२२ ताडबोरगाव - देवळगाव आवचार - सावरगाव खु - पाळोदी - पिंपळा राज्यमार्ग ६१ - मंगरुळ - रामपुरी बु - साळापुरी रुमणा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२के राज्य मार्ग ६१ असा परभणी तालुक्यापर्यंत जाणाऱ्या या रस्त्याचे काम एशियन इन्फ्रा इन्वेस्टमेंट बँक अंतर्गत होणार आहे. या प्रमुख रस्ता कामासाठी आमदार राजेश विटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर अहवाल सादर करून त्याची गरज विषद केली होती, त्याचे महत्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी ४२ किलोमीटरच्या कामासाठी ४२० कोटी रुपयांची मंजुरी देत सोमवारी (दि.२२) पुरवणी मागण्यात बजेट बुकद्वारे अंतिम रूप दिले. या रस्त्यामुळे पाथरी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांना फायदा होणार असून ही गावे या रस्त्याने जोडली जाणार आहेत, अशी माहिती आमदार विटेकर यांनी दिली
या रस्ता मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, एकनाथराव शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन मंजुरी दिली असल्याचे आमदार राजेश विटेकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis