
नंदुरबार, 23 जून, (हिं.स.) तळोदा तालुक्यात मंगळवार, दिनांक 23 जून रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे खर्डी खुर्द ते बोरवणपाडा दरम्यानच्या नाल्याला पूर आल्याने परिसरातील सुमारे 10 गाव-पाड्यांचा संपर्क तात्पुरता खंडित झाला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून कोणतीही जीवित अथवा पशुहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती तहसिलदार दिपक धिवरे यांनी दिली आहे.
बोरवणपाडा परिसरातील नाल्याला आलेल्या पुरामुळे बोरवणपाडा, टाकळी, विहिरीमाळ, बेडवाई, घोडमाग, केलापाणी, अक्राणी, हातबारी, रावलापाणी, गायमुख आदी गाव-पाड्यांकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. संबंधित गावांशी प्रशासनाचा संपर्क कायम असून परिस्थितीवर सतत देखरेख ठेवली जात आहे.
दरम्यान, खर्डी खुर्द ते बोरवणपाडा दरम्यानच्या नाल्यावर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पुलाचे बांधकाम सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पूरस्थिती ओसरल्यानंतर वाहतूक पूर्ववत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासन व महसूल यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यकतेनुसार प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार दिपक धिवरे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर