
- धनंजय मुंडेंची मुख्य सूत्रधाराच्या अटकेची मागणी
बीड, 23 जून (हिं.स.) : केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणाचे पडसाद मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात उमटले असून, माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला.
केज येथे 20 जूनच्या रात्री पूर्वनियोजित कट रचून करण्यात आलेल्या हल्ल्यात विलास घुले या तरुणाची निर्घृण हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ केज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून, घटनेनंतर चौथ्या दिवशीही नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे.
विधानसभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी एका निष्पाप नागरिकाचा बळी जाणे आणि चार दिवस उलटूनही अंत्यसंस्कार न होणे ही अत्यंत गंभीर व वेदनादायी बाब असल्याचे नमूद केले. या प्रकरणात केवळ वरवरची कारवाई न करता गुन्ह्याची पाळेमुळे शोधून मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी थेट गृहमंत्र्यांकडे केली.
घटनेनंतर न्यायाच्या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून, परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे गृह विभागाने केज पोलिसांना योग्य दिशेने तपास करण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृह विभागाला तातडीने योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती सभागृहात देण्यात आली.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis