तुळजापूर-औसा मार्गावर दुचाकी अपघात; महिलेचा मृत्यू
हेल्मेट न घातल्याने गंभीर दुखापत; निष्काळजी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल लातूर, २३ जून (हिं.स.) : तुळजापूर-औसा मार्गावरील उजणी येथील पुलाजवळ झालेल्या दुचाकी अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी भादा पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन
अपघात लोगो


हेल्मेट न घातल्याने गंभीर दुखापत; निष्काळजी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

लातूर, २३ जून (हिं.स.) : तुळजापूर-औसा मार्गावरील उजणी येथील पुलाजवळ झालेल्या दुचाकी अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी भादा पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजली गणेश नकाते (रा. मंगळवेढा, जि. सोलापूर) या ज्यूपीटर स्कूटीवर (क्र. एमएच २४ सीसी ९८७६) मागे बसून प्रवास करत होत्या. त्यावेळी चालक सचिन सुग्रीव यादव (रा. चांडेश्वर, ता. जि. लातूर) याने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालविल्याने उजणी येथील पुलाजवळील गतिरोधकावर स्कूटी आदळली.

या अपघातात अंजली नकाते या दुचाकीवरून खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी त्यांनी हेल्मेट परिधान केलेले नसल्याचे समोर आले आहे.

या घटनेप्रकरणी नागनाथ दगडू बळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२६/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१, १२५(अ) आणि १२५(ब) अंतर्गत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अमलदार कांबळे करीत आहेत.

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दुचाकी चालक आणि मागील आसनावरील प्रवाशांनीही मानांकित हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले आहे. नागरिकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande