
मुंबई, 23 जून (हिं.स.)। आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूतम भयम’मधील बहुप्रतीक्षित गाणं ‘गोमु सासरला जाते’ प्रदर्शित झालं असून, प्रदर्शित होताच या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हळदी समारंभाचा उत्साह, धमाल-मस्ती, जोशपूर्ण नृत्य आणि कानावर पडताच ठेका धरायला लावणारा ताल यामुळे हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच ट्रेण्डिंगमध्ये आले आहे.
हे गाणं फक्त ऐकतानाच आनंद देत नाही, तर पाहातानाही तितकंच मनोरंजक आणि रंगतदार आहे. हळदीच्या सोहळ्यातील गोंधळ, मित्रमंडळींची धम्माल, नाच-गाण्याचा जल्लोष आणि एका सुंदर तरुणीभोवती फिरणारी गंमतीशीर चढाओढ यामुळे प्रत्येक फ्रेममध्ये मनोरंजनाची पर्वणी अनुभवायला मिळते. लग्नसमारंभात आवर्जून वाजणारे हे गाणे प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे आहे.
गायक आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजाने गाण्याला वेगळीच ऊर्जा मिळाली आहे. समीर सप्तीस्कर यांचं जोशपूर्ण संगीत आणि अभिषेक खणकर यांचे खुसखुशीत शब्द या गाण्याला अधिकच आकर्षक बनवतात. तर पवन आणि बॉब यांच्या कोरिओग्राफीमुळे प्रत्येक दृश्य उत्साहाने ओसंडून वाहाताना दिसते.
संगीत दिग्दर्शक समीर सप्तीस्कर म्हणाले, ‘’हे गाणं तयार करताना आमच्या डोळ्यांसमोर एकच चित्र होतं, हळदी समारंभात मनमुराद नाचणारी आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी मंडळी. त्यामुळे गाण्याचं संगीतही तितकंच उत्स्फूर्त, धमाल आणि ऊर्जा देणारं ठेवण्याचा प्रयत्न केला. पारंपरिक ढंगाला आधुनिक सादरीकरणाची जोड दिल्यामुळे हे गाणं सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल, अशी अपेक्षा आहे. आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजामुळे गाण्याला एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे.’’
याविषयी लेखक-दिग्दर्शक रामचंद्र अरुण गांवकर म्हणाले, “‘गोमु सासरला जाते’ हे गाणं तयार करताना आमचा एकच उद्देश होता तो म्हणजे प्रेक्षकांना दोन -तीन मिनिटांचा निव्वळ आनंदाचा अनुभव देणं. लग्नात, हळदीत किंवा कोणत्याही सेलिब्रेशनमध्ये हे गाणं लागलं की, लोकांनी विचार न करता मनमोकळेपणाने नाचावं, हसायला लागावं आणि त्या क्षणाचा आनंद घ्यावा, अशी आमची इच्छा होती. या गाण्यात भरपूर ऊर्जा, मजा आणि मनोरंजन आहे. चित्रपटाचा मूड काय आहे, याची झलकही या गाण्यातून मिळते. प्रेक्षकांनी हे गाणं पुन्हा पुन्हा पाहावं आणि प्रत्येक वेळी त्याच उत्साहाने एन्जॉय करावं, एवढीच अपेक्षा आहे.”
प्रेक्षकांची लाडकी 'ऑरेंज ज्यूस गँग' करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, मनमीत पेम आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन रामचंद्र अरुण गांवकर यांनी केले असून, झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ या चित्रपटाचे नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे निर्माते आहेत, तर बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर