चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी - वडेट्टीवार
मुंबई, 23 जून (हिं.स.)। चंद्रपूर, गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वाघ-मानव संघर्षाची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. तेंदुपत्ता, मोहफूल आणि इतर वनउत्पादनांच्या संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या नागरिकांवर वारंवार वाघांचे हल्ले होत असून अनेक कुटुं
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी - वडेट्टीवार


मुंबई, 23 जून (हिं.स.)। चंद्रपूर, गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वाघ-मानव संघर्षाची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. तेंदुपत्ता, मोहफूल आणि इतर वनउत्पादनांच्या संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या नागरिकांवर वारंवार वाघांचे हल्ले होत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभेत लक्षवेधीद्वारे गंभीर प्रश्न उपस्थित करत काँग्रेस विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.

वडेट्टीवार म्हणाले की, माझ्या मतदारसंघात वाघाने हल्ला केला.यात चार महिलांचा मृत्यू झाला..ती कुटुंब पोरकी झाली आहेत. वाघ आमच्यासाठी वरदान आहे की शाप? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सांगितले की, जंगलांचे संगोपन स्थानिक आदिवासी आणि ग्रामीण नागरिकांनी केले, मात्र आज त्यांचाच जीव धोक्यात आला आहे. हजारो कुटुंबे जंगलावर आधारित रोजगारावर अवलंबून आहेत. तेंदुपत्ता, मोहफूल आणि इतर वनउत्पादनांच्या संकलनासाठी त्यांना जंगलात जावेच लागते. अशा परिस्थितीत केवळ आर्थिक मदत देऊन प्रश्न सुटणार नाही.

लक्षवेधीच्या माध्यमातून वडेट्टीवार यांनी सरकारला विचारले की, राज्यात वाघांची संख्या सातत्याने वाढत असताना अतिरिक्त वाघांचे पुनर्वसन किंवा अन्य अभयारण्यांमध्ये स्थलांतर करण्याबाबत सरकारचे काय धोरण आहे? जंगलाच्या क्षमतेपेक्षा अधिक वाघ झाल्यामुळे ते शेतांमध्ये आणि मानवी वस्त्यांमध्ये येत असून संघर्ष वाढत आहे. वाघांची संख्या नियमितपणे मोजली जाते, मात्र वाढलेल्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, याचे उत्तर सरकारने द्यावे.

तसेच ज्या कुटुंबातील कर्ता सदस्य वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडतो, त्या कुटुंबाचे आयुष्यच उद्ध्वस्त होते. २५ लाख रुपयांची मदत मिळाली तरी मृत व्यक्ती परत येत नाही. त्यामुळे अशा कुटुंबातील पात्र सदस्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

वनक्षेत्रालगतच्या भागांमध्ये नागरिकांना जंगलात जाण्याची गरज कमी व्हावी यासाठी पूर्वी दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करून आदिवासी आणि वनक्षेत्रातील कुटुंबांना वर्षभरासाठी १२ गॅस सिलेंडर मोफत देण्यात यावेत, जेणेकरून सरपणासाठी जंगलात जाण्याची गरज कमी होईल आणि मानवी जीवितहानी टळेल अशी मागणी वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांच्या घरात कायमस्वरुपी नोकरी देण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे.हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्यात येईल अस वनमंत्र्यांनी स्पष्ट केले.

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना राबवत असून वाघ-मानव संघर्ष कमी करण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात येत आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र सफारी करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे वनमंत्री म्हणाले. वाघ दुसऱ्या जिल्ह्यात वितरीत करण्याचे प्रयत्न करण्यात येईल अस ही वनमंत्री म्हणाले.

वडेट्टीवार यांनी या प्रश्नाकडे केवळ वन्यजीव संवर्धनाचा विषय म्हणून न पाहता मानवी जीवन, रोजगार आणि पुनर्वसनाचा प्रश्न म्हणून पाहण्याची गरज असल्याचे सांगत सरकारने तातडीने ठोस आणि परिणामकारक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी लक्षवेधीच्या माध्यमातून केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande