
नवी दिल्ली, 23 जून (हिं.स.) : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २६ ते २८ जून दरम्यान दोन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी आयर्लंडचा दौरा करणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. एमआरआयमध्ये त्याच्या डाव्या मांडीच्या स्नायूमध्ये सूज आणि एक फायबर फाटल्याचे समोर आले आहे. पुढील तपासणीसाठी त्याला सीओईमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
इतकेच नाही, तर त्याचा इंग्लंड दौराही धोक्यात आला आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर, संघ १ ते ११ जुलै दरम्यान इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. या मालिकेत नितीशचा सहभाग होण्याची शक्यता कमी आहे. कारण त्याला बरे होण्यासाठी किमान तीन ते चार आठवडे लागतील.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नितीशने भारतीय संघात पुनरागमन केले होते. दुखापतीमुळे तो बऱ्याच काळापासून मैदानाबाहेर होता. दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याच्या जागी रेड्डीचा एकदिवसीय मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला, जिथे त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. आता तो एकदिवसीय सामन्यांमध्ये पांड्यासाठी एक मजबूत पर्याय म्हणून उदयास आला आहे.
दुखापतीमुळे नितीश अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील दुसरा सामना खेळू शकला नाही. त्यावेळी त्याच्या दुखापतीबद्दल माहिती देताना बीसीसीआयने सांगितले होते की, त्याच्या डाव्या मांडीत वेदना होत असून बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर देखरेख ठेवत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ३१ धावांत दोन बळी घेणारा रेड्डी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात परतला, पण त्याला एकही बळी घेता आला नाही. त्याने सहा षटकांत ४२ धावा दिल्या होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे