तांत्रिक बिघाडामुळे जर्मनीतील रेल्वे सेवा ठप्प; हजारो प्रवासी अडकले
बर्लिन, 24 जून (हिं.स.)।जर्मनीमध्ये संचार प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे मंगळवारी उशिरा रात्री रेल्वे सेवा ठप्प झाली. यामुळे देशभरातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेक गाड्या थांबल्याने प्रवासी विविध स्थानकांवर अडकून पडले. आपल्या
तांत्रिक बिघाडामुळे जर्मनीतील रेल्वे सेवा ठप्प; हजारो प्रवासी अडकले


बर्लिन, 24 जून (हिं.स.)।जर्मनीमध्ये संचार प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे मंगळवारी उशिरा रात्री रेल्वे सेवा ठप्प झाली. यामुळे देशभरातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेक गाड्या थांबल्याने प्रवासी विविध स्थानकांवर अडकून पडले. आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांच्या स्थानकांवरील माहिती केंद्रांपुढे मोठ्या रांगा लागल्या होत्या, जिथे ते पुढील प्रवासाबाबत माहिती घेण्यासाठी पोहोचले होते.

जर्मनीची प्रमुख राष्ट्रीय रेल्वे कंपनी डॉइचे बानने सांगितले की, जीएसएम-आर (ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाइल कम्युनिकेशन्स-रेल्वे) या डिजिटल संचार प्रणालीमध्ये देशव्यापी अडचण निर्माण झाल्यामुळे सर्व रेल्वे गाड्या स्थानकांवर थांबवण्यात आल्या. ही प्रणाली रेल्वे नेटवर्कमधील अंतर्गत संवादासाठी वापरली जाते. डॉइचे बानने मध्यरात्री जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, बिघाडाचे कारण शोधण्यात आले आहे, मात्र नेमकी खराबी कशामुळे झाली याची माहिती देण्यात आलेली नाही. कंपनीने म्हटले, “तंत्रज्ञ समस्या दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत.”

प्रभावित प्रवाशांना टॅक्सी आणि हॉटेल व्हाउचर उपलब्ध करून दिले जातील, असेही कंपनीने स्पष्ट केले. ज्या ठिकाणी शक्य असेल, तेथे स्थानकांवर उभ्या असलेल्या गाड्यांमध्ये प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या परिस्थितीबद्दल कंपनीने खेदही व्यक्त केला.

बिघाडाची माहिती मिळाल्यानंतर सुमारे दोन तासांनी नेटवर्कच्या काही भागांमध्ये रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. बर्लिनच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कने गाड्या सुरू असल्याचे सांगितले असले, तरी प्रवाशांनी उशीर आणि काही सेवा रद्द होण्याची शक्यता गृहीत धरावी, असा इशारा दिला आहे.

पश्चिम आणि नैऋत्य जर्मनीतील काही भागांमध्ये प्रादेशिक रेल्वे सेवा चालवणाऱ्या डीबी रेजिओ मिट्टेनेही सेवा पूर्ववत झाल्याचे सांगितले. मात्र, बुधवारी सकाळी किमान सहा वाजेपर्यंत गाड्यांच्या उशिरा धावण्याची आणि काही सेवा रद्द होण्याची शक्यता कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

जीएसएम-आर (ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाइल कम्युनिकेशन्स-रेल्वे) ही प्रणाली रेल्वे संचालनासाठी आवश्यक असलेल्या आवाज आणि डेटा सेवा पुरवते. याच माध्यमातून रेल्वे चालक आणि नियंत्रण केंद्रांदरम्यान संपर्क साधला जातो. युरोपियन संघ रेल्वे एजन्सीच्या माहितीनुसार, २००० सालापासून संपूर्ण युरोपमध्ये ही प्रणाली रेल्वे संचालनासाठी समान मानक म्हणून वापरली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande