
नवी दिल्ली, 27 जून (हिं.स.) : ग्लासगो येथे होणाऱ्या २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय वेटलिफ्टिंग संघाची घोषणा करण्यात आली असून, ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू या संघाचे नेतृत्व करेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोनदा सुवर्णपदक जिंकणारी मीराबाई महिलांच्या ४८ किलो वजनी गटात स्पर्धा करेल; या गटात तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर यापूर्वीही मोठे यश मिळवले आहे.
भारताच्या सर्वात यशस्वी वेटलिफ्टर्सपैकी एक असलेल्या मीराबाई चानूने आतापर्यंत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तीन पदके जिंकली आहेत. गोल्ड कोस्ट २०१८ मध्ये सुवर्ण (४८ किलो), बर्मिंगहॅम २०२२ मध्ये सुवर्ण (४९ किलो) आणि ग्लासगो २०१४ मध्ये रौप्य (४८ किलो).
माजी विश्वविजेती आणि टोकियो २०२० ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती असलेल्या मीराबाईने यापूर्वी फेब्रुवारीमध्ये मोदीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता आणि ४८ किलो वजनी गटात विजेतेपद पटकावले होते. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या खांद्याच्या दुखापतीतून सावरत असल्याने तिला मे महिन्यातील आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपला मुकावे लागले होते.
चानूच्या सोबतीला बर्मिंगहॅम २०२२ मधील पदक विजेत्या बिंद्याराणी देवी आणि हरजिंदर कौर असतील, ज्या अनुक्रमे महिलांच्या ५८ किलो आणि ६९ किलो वजनी गटात स्पर्धा करतील. या दोघींनीही स्पर्धेच्या मागील आवृत्तीत रौप्यपदके जिंकली होती. पुरुषांच्या गटात, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मधील कांस्यपदक विजेता लवप्रीत सिंग +११० किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करेल.
ऋषिकंत सिंग (६० किलो), अजय बाबू (७९ किलो) आणि दिलबाग सिंग (९४ किलो) हे खेळाडू ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदार्पण करतील. २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंगच्या स्पर्धा २६ ते ३० जुलै या कालावधीत 'एसईसी आर्माडिलो' येथे होणार आहेत.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंगमध्ये भारताची कामगिरी अलीकडील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट झाली आहे. गोल्ड कोस्ट २०१८ आणि बर्मिंगहॅम २०२२ या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताने अव्वल देशांमध्ये स्थान मिळवले होते. बर्मिंगहॅम स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सनी पाच सुवर्णपदकांसह एकूण नऊ पदके जिंकली होती.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा वेटलिफ्टिंग संघ
महिला: मीराबाई चानू (48 किलो), ज्ञानेश्वरी यादव (53 किलो), बिंद्याराणी देवी (58 किलो), हरजिंदर कौर (69 किलो), संजना (77 किलो), मार्टिना देवी (+86 किलो)
पुरुष : ऋषिकांत सिंग (६० किलो), एम राजा (६५ किलो), अजय बाबू (७९ किलो), दिलबाग सिंग (९४ किलो), लवप्रीत सिंग (+११० किलो).
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे