रत्नागिरी : अर्थव शेंड्येकडून सायकल एव्हरेस्टिंग पूर्ण
रत्नागिरी, 28 जून (हिं.स.) । गणपतीपुळे येथील २० वर्षीय अथर्व शेंड्ये याने सायकल एव्हरेस्टिंग यशस्वीरीत्या पूर्ण केले. रत्नागिरीजवळील टेंबेपूल ते चाळकेवाडी जलशुद्धीकरण केंद्र हा चढाव त्याने तब्बल ७० वेळा पार करत ४१ तासांत सलग ५०० किलोमीटरहून अधिक स
अथर्व शेंड्ये याने सायकल एव्हरेस्टिंग पूर्ण केल्यानंतर


रत्नागिरी, 28 जून (हिं.स.) । गणपतीपुळे येथील २० वर्षीय अथर्व शेंड्ये याने सायकल एव्हरेस्टिंग यशस्वीरीत्या पूर्ण केले.

रत्नागिरीजवळील टेंबेपूल ते चाळकेवाडी जलशुद्धीकरण केंद्र हा चढाव त्याने तब्बल ७० वेळा पार करत ४१ तासांत सलग ५०० किलोमीटरहून अधिक सायकलिंग आणि १०,००० मीटरपेक्षा जास्त उंचीची चढाई पूर्ण केली.

समुद्रसपाटीपासून एव्हरेस्ट शिखराची उंची ८,८४८ मीटर आहे. सायकलस्वाराने एका निश्चित टेकडीवर सतत चढउतार करत किमान ८,८४८ मीटर उंची गाठणे याला एव्हरेस्टिंग असे म्हटले जाते. जगभरातील सायकलपटूंमध्ये हा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि आव्हानात्मक उपक्रम मानला जातो.

रत्नागिरी परिसरात एव्हरेस्टिंगच्या कठोर नियमांमध्ये बसणारा चढ उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक सायकलप्रेमींना यासाठी मुंबई. पुणे किंवा इतर शहरांमध्ये जावे लागत होते. गेली दोन वर्षे अथर्व अशा योग्य चढावाच्या शोधात होता. एव्हरेस्टिंगचे नियम अत्यंत कठोर असल्याने अनेक चढाव पात्र ठरत नव्हते. अखेर अथक प्रयत्नानंतर त्याने टेंब्ये चाळकेवाडी हा मार्ग शोधून काढला आणि त्याला एव्हरेस्टिंगसाठी मान्यता मिळवून दिली.

हा चढ तब्बल ७० वेळा सायकलवरून चढणे आणि उतरणे ही खरी कसोटी होती. एव्हरेस्टिंगच्या नियमांनुसार झोप घेता येत नसल्याने अथर्वने खाणे, नैसर्गिक क्रिया, मसाज आणि इतर आवश्यक विश्रांतीसाठी मिळणारा अत्यल्प वेळ अतिशय नियोजनपूर्वक वापरला.

या संपूर्ण मोहिमेसाठी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, टीम कोकण कोस्टल मॅरेथॉन तसेच टेंबेपूल व पोमेंडी गावातील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. जवळपास ४१ तास रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि टीम कोकण कोस्टलचे सदस्य या मार्गावर जागता पहारा देत होते. अथर्व मानसिकदृष्ट्या खंबीर राहावा यासाठी अनेक सदस्य त्याच्यासोबत सायकलिंग करत राहिले. तसेच हायड्रेशन, न्यूट्रिशन आणि इतर आवश्यक गरजांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली.

टीम कोकण कोस्टल मॅरेथॉनशी संबंधित पोमेंडी येथील सचिन मराठे, सौ. मानसी मराठे व कुटुंबीयांनी अथर्वसाठी जेवण, नाश्ता आदी व्यवस्था केली. अथर्व देवस्थळी यांनी तब्बल ४१ तास जागे राहून ऑन-रूट सपोर्ट दिला. तसेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत, उपाध्यक्ष दर्शन जाधव, सचिव डॉ. नितीन सनगर व सर्व कार्यकारिणी सदस्य यांच्यासमवेत सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी, डॉ. राज कवठे, रुद्र जाधव, ज्ञानेश्वर पांडे, विवेक खानविलकर, विनायक पावसकर, सौरभ रावणंग, विशाल भोसले, अविनाश फडके, केदार देवस्थळी, राकेश होरंबे, राहुल भोसले, श्रीनंद लिमये, गजानन भातडे, अमित पोटफोडे, अभिजित पड्याळ, प्रसाद खेडेकर, प्रथमेश प्रभुदेसाई, सचिन नाचणकर, योगेश सामंत, सौ. मुग्धा भट-सामंत इत्यादी सदस्यांनी मसाज, तांत्रिक मदत तसेच अथर्वच्या मानसिक आणि शारीरिक तयारीची विशेष काळजी घेतली.

अथर्वच्या या यशामुळे एव्हरेस्टिंग उपक्रमाचे एक नवे दालन संपूर्ण कोकणासाठी खुले झाले आहे. येत्या काळात महाराष्ट्रासह देशभरातील अधिकाधिक सायकलपटू एव्हरेस्टिंगसाठी रत्नागिरीत येतील, असा विश्वास रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने व्यक्त केला.

आपल्या यशाबद्दल अथर्व शेंड्ये म्हणाला, रत्नागिरीत ८ जानेवारी २०२३ रोजी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने आयोजित केलेले रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन' खऱ्या अर्थाने जिल्ह्याला दिशा देणारे ठरले. संमेलनानंतर सविस्तर माहिती घेतली असता राम जोशी यांच्याकडून 'एव्हरेस्टिंग' ही संकल्पना समजली. या प्रवासात सायकल गौरव पुरस्कारप्राप्त विनायक वैद्य, अंबरीश गुरव, तसेच राम जोशी, मीरा वेलणकर तसेच पुणे येथील सौ. जोग यांच्याकडून तांत्रिक मार्गदर्शन मिळाले. यामुळेच हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करू शकलो. एव्हरेस्ट शिखर रत्नागिरीत आणल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. यापूर्वी सुपर रेन्डोनिअरचा किताब मिळवता असून क्लबसोबत नियमित सायकलिंग करत आहे. सध्या हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande