
तेहरान , 28 जून (हिं.स.)।अमेरिका आणि इस्रायलसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने आता इटलीवरही गंभीर आरोप केले आहेत. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी इटलीवर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. एका बाजूला इटलीने इराणविरोधातील कोणत्याही लष्करी कारवाईत सहभागी नसल्याचा दावा केला आहे, तर दुसऱ्या बाजूला “तांत्रिक आणि रसदविषयक (लॉजिस्टिक) मदत” दिल्याची कबुली दिली आहे, असे बघाई यांनी म्हटले. इराणने याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी समाजमाध्यम एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये इटलीचे विधान परस्परविरोधी असून, जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली. त्यांनी म्हटले की, आक्रमक देशांना तांत्रिक आणि रसदविषयक मदत करणे म्हणजे बेकायदेशीर युद्धात थेट सहभागी होण्यासारखे आहे. ही केवळ मदत नसून, अमेरिका आणि इस्रायलच्या कथित आक्रमक युद्धाला प्रत्यक्ष हातभार लावणारे स्पष्ट योगदान असल्याचा आरोप त्यांनी केला.
बघाई यांनी पुढे म्हटले की, इटली एका बाजूला सार्वजनिकरीत्या आक्रमण करणाऱ्या देशांना मदत केल्याचे नाकारत आहे, तर दुसऱ्या बाजूला तांत्रिक आणि रसदविषयक सहकार्याची कबुली देत आहे. हे गंभीर आंतरराष्ट्रीय गैरकृत्यात सहभागी होण्यासारखे आहे. अशा प्रकारची मदत म्हणजे बेकायदेशीर युद्धाला थेट पाठिंबा देण्यासारखे असून, ती संयुक्त राष्ट्रांच्या सनदेच्या भावनेलाही विरोधी आहे.
यापूर्वी इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनिओ तयानी यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान तयानी यांनी स्पष्ट केले की, इटलीने इराणविरोधातील कोणत्याही लष्करी मोहिमेत कधीही सहभाग घेतलेला नाही. तसेच, इटलीने आपल्या कोणत्याही लष्करी तळांचा वापर इराणविरोधातील युद्धसंबंधित कारवायांसाठी करण्यास परवानगी दिलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय अमेरिकेसोबत झालेल्या करारांचा पूर्ण आदर राखून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या चर्चेदरम्यान अँटोनिओ तयानी यांनी होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याचे आवाहनही केले. या भागात अनेक इटालियन मालवाहू जहाजे अद्याप अडकून पडली असल्याने समुद्री मार्ग पूर्ववत सुरू होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तयानी यांनी पुढे म्हटले की, तेहरान येथील इटलीचा दूतावास पुन्हा सुरू होणे हा संवादाच्या दिशेने सकारात्मक संकेत असून, त्यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत होण्यास मदत होईल.
इराण आणि इटली यांच्यातील ही शाब्दिक चकमक अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा संपूर्ण पश्चिम आशिया आधीच तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करत आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या भूमिकेबाबत इराण सातत्याने कठोर भूमिका घेत आहे. अशा परिस्थितीत इटलीवर करण्यात आलेल्या ताज्या आरोपांमुळे या प्रदेशातील राजनैतिक तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.तज्ज्ञांच्या मते, हा वाद लवकर मिटला नाही, तर त्याचा परिणाम प्रादेशिक व्यापार तसेच समुद्री सुरक्षेवरही होऊ शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode