

रायगड, 28 जून (हिं.स.) : फुटबॉल विश्वचषकाच्या उत्साहपूर्ण वातावरणात खोपोलीतील फुटबॉलप्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी खोपोली प्रभाग क्रमांक ५ येथील ब्लू स्टार फुटबॉल क्लब, भानवज बौद्धवाडा यांच्या वतीने फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) तसेच नगरसेवक दिनेश थोरवे यांच्या विशेष सहकार्याने आयोजित या स्पर्धेचा शुभारंभ नगरसेवक तथा शिवसेना गटनेते संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक युवकांना आपली फुटबॉलमधील गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळणार असून, ग्रामीण व शहरी भागातील होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी आरपीआयचे खोपोली शहराध्यक्ष नितीन वाघमारे, शिवसेना उपशहरप्रमुख विशाल गायकवाड, आरपीआय युवक अध्यक्ष भाई रुपवते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देत खेळाडूंनी क्रीडाभावना जपत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करावे, असे आवाहन केले.
रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड आणि युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी भानवज बौद्धवाडा शाखेतील युवकांना सहकार्य व प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी सर्व मान्यवर, सहकारी आणि क्रीडाप्रेमी नागरिकांचे आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)