विरोधकांच्या आंदोलनांदरम्यान सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुचिच देणार राजीनामा
बेलग्रेड, 28 जून (हिं.स.)।सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुचिच यांनी येत्या काही आठवड्यांत आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे देशात नियोजित वेळेपूर्वीच सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली
विरोधकांच्या आंदोलनांदरम्यान सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष     अलेक्झांडर वुचिच देणार राजीनामा


बेलग्रेड, 28 जून (हिं.स.)।सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुचिच यांनी येत्या काही आठवड्यांत आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे देशात नियोजित वेळेपूर्वीच सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी आणि युवा संघटना सरकार विरोधात सातत्याने आंदोलन करत असून, लवकर संसदीय निवडणुका घेण्याची मागणी करत आहेत. शनिवारी राजधानी बेलग्रेड येथे आपल्या समर्थकांना संबोधित करताना वुचिच म्हणाले की, ते आणखी काही आठवडेच राष्ट्राध्यक्षपदावर राहतील आणि त्यानंतर राजीनामा देतील. मात्र, त्यांनी राजीनामा नेमका कधी देणार आणि निवडणुका कधी होणार, याबाबत कोणतीही तारीख जाहीर केली नाही.

वुचिच यांनी आगामी निवडणुकीत आपल्या सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टीसाठी प्रचार करणार असल्याचे सांगितले. तसेच, यावेळीही त्यांच्या पक्षाला पूर्वीपेक्षा अधिक मोठा विजय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सर्बियाच्या कायद्यानुसार, वुचिच सलग तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकत नाहीत. सध्या त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू असून, नियमित राष्ट्राध्यक्ष आणि संसदीय निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. गेल्या वर्षभरापासून देशभरातील विद्यार्थी आणि युवा संघटना वुचिच सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. आंदोलकांचा आरोप आहे की, वुचिच यांच्या कारकिर्दीत लोकशाही संस्था कमकुवत झाल्या असून सरकार अधिक केंद्रीकृत आणि कठोर होत गेले आहे.

या आंदोलनाची सुरुवात नोव्हेंबर २०२४ मध्ये झाली होती. त्यावेळी उत्तर सर्बियातील नोवी साद रेल्वे स्थानकावरील काँक्रीटचे छत कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला होता. सरकारी प्रकल्पांमधील भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या आंदोलनांवर वुचिच सरकारने कठोर कारवाई केली. अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले, तर पोलिसांनी आवश्यकतेपेक्षा अधिक बळाचा वापर केल्याचे आरोपही करण्यात आले.

दरम्यान, युरोपियन संघाने (ईयू) सर्बियामधील लोकशाही कमकुवत होत असल्याबद्दल आणि माध्यमांवर वाढत्या दबावाबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्राध्यक्षांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर आता सर्बियाच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वुचिच यांनी नियोजित वेळेनुसार राजीनामा दिल्यास देशात लवकरच निवडणुका घेण्यात येऊ शकतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande