
नाशिक, 28 जून (हिं.स.)।
: कालिका देवी मंदिर संस्थान, यशवंत व्यायाम शाळा, क्रीडा संस्कृती फाउंडेशन आणि दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २३ ते ३० जून दरम्यान ऑलिंपिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत काल आणि आज दिनांक २७ आणि २८ जून दरम्यान यशवंत व्यायाम शाळेच्या क्रीडांगणावर ज्युनियर गटाच्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुलांच्या २१ तर मुलीच्या १३ संघांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये नाशिक शहरातील शाळा आणि संस्था यांच्या संघाबरोबरच मालेगाव, घोटी, इगतपुरी, म्हसरूळ, एकलहरे, नाशिक रोड , सिडको आदी भागातील संघांचा समावेश होता. या स्पर्धा १४ वर्षे आणि १७ वर्षे अश्या दोन वयोगटात खेळविल्या गेल्या. खेळाडूंना जास्तीत जास्त सामने खेळायला मिळावे यासाठी या स्पर्धेत प्रथम साखळी सामने आणि त्यानंतर बाद पद्धतीने सामने खेळविले गेले.
या स्पर्धेत मुलांमध्ये १७ वर्षे गटात अटीतटीच्या अंतिम लढतीत जनता विद्यालय, मखमलाबादच्या संघाने मालेगावच्या लिटील एन्जल या संघाचा १९-२५, २५- १८ आणि २५-१७ असा २-१ ने पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलांच्या १४ वर्षे गटात यशवंत व्यायाम शाळेच्या संघाने अंतिम सामन्यात मालेगांवच्या लिटील एन्जल संघावर २५-१७ आणि २५-१५ असा सरळ २-० ने पराभव करून विजेतेपद मिळविले. मुलीमध्ये देवाज क्लब, नवीन नाशिक या संघाने अंतिम सामना जिंकून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.तर दुसरा क्रमांक नाशिकच्या होरायझन स्कुलने मिळविला. या गटात नाशिकरोडच्या र. ज. बिटको शाळेच्या संघाने तिसरा क्रमांक मिळविला. मुलीच्या १४ वर्षे गटात मित्र विहाराच्या संघाने अंतिम सामन्यात यशवंत व्यायाम शाळेच्या संघाला पराभूत करून या गटाचे विजेतेपद मिळविले.
या स्पर्धेचे उदघाटन यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले की खेळाडूंनी खेळात भाग घेऊन आपला शारीरिक आणि बौद्धिक विकास घडवावा. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या परीने जे काही आवश्यक आहे त्याची पूर्तता करण्याचे काम आम्ही आमच्या परीने करत आहोत. खेळाडूंनी याचा फायदा घेऊन आपल्या खेळामध्ये प्रगती करून आपल्या संस्थेचे, जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव उज्वल करावे असे सांगितले. यावेळी या उपक्रमाचे प्रमुख आनंद खरे. छत्रपती पुरस्कार प्राप्त अविनाश खैरनार, किरण थोरात, उमेश सेनभक्त, वैभव उत्तेकर, कपिल पगार, भाग्यश्री पगारे, सलमान शेख आदी उपस्थित होते.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अविनाश खैरनार आणि उमेश सेनभक्त, यांचा मार्गदर्शनाखाली यशवंत व्यायाम शाळेच्या खेळाडूंनी अथक परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV