स्वागत आहे, पण चांगले वागा; ट्रम्प यांनी सादर केला अमेरिकेचा विशेष पासपोर्ट
वॉशिंग्टन , 28 जून (हिं.स.)। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या २५० व्या वर्धापनदिनानिमित्त जारी करण्यात येणाऱ्या विशेष स्मरणिका (कॉमेमोरेटिव्ह) अमेरिकी पासपोर्टची नवीन रचना (डिझाइन) सादर केली आहे. या मर्यादित आवृत्तीच्या (लिमिटेड एडिश
स्वागत आहे, पण चांगले वागा; ट्रम्प यांनी सादर केला अमेरिकेचा विशेष पासपोर्ट


वॉशिंग्टन , 28 जून (हिं.स.)। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या २५० व्या वर्धापनदिनानिमित्त जारी करण्यात येणाऱ्या विशेष स्मरणिका (कॉमेमोरेटिव्ह) अमेरिकी पासपोर्टची नवीन रचना (डिझाइन) सादर केली आहे. या मर्यादित आवृत्तीच्या (लिमिटेड एडिशन) पासपोर्टमध्ये ट्रम्प यांचे छायाचित्रही समाविष्ट करण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या पासपोर्टचा नमुना शेअर करत लिहिले, “अमेरिकेच्या नव्या पासपोर्टवर लिहिले आहे – स्वागत आहे, पण चांगले वागा.”

जारी करण्यात आलेल्या डिझाइनमध्ये पासपोर्टच्या एका पानावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे छायाचित्र आहे. या छायाचित्राच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या ऐतिहासिक स्वातंत्र्य घोषणापत्राचा मजकूर छापण्यात आला असून, त्याखाली ट्रम्प यांच्या स्वाक्षरीचाही समावेश करण्यात आला आहे. तर समोरील पानावर प्रसिद्ध चित्रकार जॉन ट्रंबुल यांच्या गाजलेल्या ‘द डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स’ या चित्राची छपाई करण्यात आली आहे.

माहितीनुसार, ट्रम्प यांचे हे छायाचित्र स्मिथसोनियन नॅशनल पोर्ट्रेट गॅलरीमध्ये प्रदर्शित असलेल्या त्यांच्या अधिकृत छायाचित्रावर आधारित आहे. यापूर्वी, यावर्षी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जाहीर केलेल्या प्रारंभिक डिझाइनमध्ये ट्रम्प यांचे वेगळे छायाचित्र वापरण्यात आले होते. त्यानंतर व्हाईट हाऊसनेही हेच डिझाइन ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत, “अमेरिकेच्या २५० व्या वर्धापनदिनानिमित्त नवीन अमेरिकी पासपोर्ट” अशी माहिती दिली.

या विशेष स्मरणिका पासपोर्टची घोषणा प्रथम एप्रिल महिन्यात अमेरिकेच्या २५० व्या वर्धापनदिनाच्या राष्ट्रीय उत्सवांतर्गत करण्यात आली होती. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या पासपोर्टच्या पुढील, मागील आणि आतील कव्हरवर विशेष कलाकृती आणि अधिक दर्जेदार छायाचित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मर्यादित आवृत्तीतील पासपोर्टचा लाभ सर्वप्रथम वॉशिंग्टन पासपोर्ट एजन्सीमार्फत पासपोर्टचे नूतनीकरण (रिन्यूअल) करणाऱ्या नागरिकांना मिळणार आहे. तर ऑनलाइन अर्ज करणारे किंवा इतर पासपोर्ट केंद्रांमधून अर्ज करणाऱ्या नागरिकांना सध्या विद्यमान डिझाइनचा पासपोर्टच दिला जाईल.

सध्या वापरात असलेल्या अमेरिकी पासपोर्टच्या आतील कव्हरवर फ्रान्सिस स्कॉट की यांच्याशी संबंधित कलाकृती आणि अमेरिकेच्या राष्ट्रगीताच्या ओळी छापलेल्या असतात. मात्र, नव्या स्मरणिका आवृत्तीत त्याऐवजी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा आणि गेल्या २५० वर्षांच्या इतिहासाचा गौरव करणाऱ्या नव्या कलाकृतींचा समावेश करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande