
नवी दिल्ली, 28 जून (हिं.स.)'मन की बात'च्या १३५ व्या पर्वात, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवक आणि मुलांना फुटबॉलशी जोडण्यासाठी नागालँडमध्ये आयोजित केल्या जात असलेल्या दोन लीगची प्रशंसा केली. त्यांनी अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या जागतिक योगासन चॅम्पियनशिपमधील भारताच्या उत्कृष्ट कामगिरीचाही त्यांनी यावेळी विशेष उल्लेख केला.
पंतप्रधानांनी नमूद केले की, जून महिन्यात आणखी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये संपूर्ण जग भारताच्या प्रयत्नांमध्ये सामील झालं होतं आणि हा कार्यक्रम होता 'आंतरराष्ट्रीय योग दिवस'. यावेळी जगभरात 2500 हून अधिक ठिकाणी योगाभ्यासाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या देशातल्या कोट्यवधी लोकांनी विविध ठिकाणी आयोजित केलेल्या योगविद्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. या महिन्यात अहमदाबाद इथे झालेल्या 'जागतिक योगासन स्पर्धे'चीही खूप चर्चा झाली. यामध्ये भारतानं एकूण 114 पदकं जिंकली, ज्यात 102 सुवर्णपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पदक तालिकेत भारतानं प्रथम क्रमांक पटकावला. मी सर्व विजयी खेळाडूंचं मनःपूर्वक अभिनंदन करतो.
पंतप्रधानांनी 'नागालँड बेबी लीग'ची प्रशंसा केली, जी नागालँडमधील मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी प्रेरित करते. ते म्हणाले की, आज देशात अशा खेळणाऱ्या आणि फुलणाऱ्या तरुणांची संख्या खूप वेगाने वाढतेय. पूर्वीच्या तुलनेत आता खूप जास्त तरुण खेळाला करिअर म्हणून स्वीकारत आहेत. मला नागालँडच्या अशा दोन रंजक प्रयत्नांबद्दल माहिती मिळाली आहे. पहिला प्रयत्न आहे ‘नागालँड बेबी लीग’. हे नाव ऐकून तुम्हाला ही लहान मुलांची एखादी साधारण लीग असेल, असं वाटलं असेल, पण तसं नाहीये. ही ५ ते १२ वर्षे वयोगटातील छोट्या-छोट्या, फुलांसारख्या मुलांची एक असामान्य लीग आहे. बाल फुटबॉल खेळाडूंची ही एक अशी लीग आहे, जी त्यांच्या वेगाला आणि प्रतिभेला प्रोत्साहन तर देतेच, शिवाय त्यांची ओळखही निर्माण करते. याची सुरुवात नागालँडच्या जास्तीत जास्त मुलांना फुटबॉलशी जोडण्याच्या उद्देशाने झाली होती. पाच ते बारा वर्षांपर्यंतची मुलं आणि मुली यात भाग घेऊ शकतात. या लीगने आता तीन वर्षं पूर्ण केली आहेत. या लीगचा मुलांच्या मनावर खूप चांगला परिणाम झाला आहे.
ते पुढे म्हणाले की, नागालँडमध्ये आणखी एक चांगला प्रयत्न होत आहे. त्याचं नाव आहे, 'नागालँड वीमेन फुटसाल लीग'. कदाचित हे 'फुटसाल' तुमच्यासाठी एक नवीन नाव असेल. मी तुम्हाला सांगतो, फुटसालला इनडोअर फुटबॉलसुद्धा म्हटलं जातं. यात एका संघात फक्त पाच खेळाडू असतात. या खेळाचं मैदान फुटबॉलच्या मैदानापेक्षा आकाराने खूप लहान असतं. यामुळे खेळाडूंना खूप जलद निर्णय घ्यावे लागतात. त्यांना तंत्राचा आणि कौशल्याचा उत्तम वापर करावा लागतो. नागालँडची वीमेन फुटसाल लीग तिथल्या मुलींना आपली प्रतिभा दाखवण्याची एक उत्तम संधी देत आहे. मी अशा उपक्रमांसाठी नागालँडच्या लोकांचं कौतुक करतो. असे प्रयत्न देशाच्या इतर भागांनाही मोठी प्रेरणा देतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे