रेनॉल्ट क्विड फेसलिफ्ट भारतात ३ जुलैला होणार लाँच
मुंबई, 28 जून (हिं.स.)। भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेली रेनॉल्टची एंट्री-लेव्हल हॅचबॅक क्विड 3 जुलै रोजी नव्या फेसलिफ्ट अवतारात बाजारात दाखल होणार आहे. गेल्या दशकभरापासून भारतीय बाजारात विक्री होत असलेल्या या कारने परवडणारी किंमत, एसयूव्हीसारख
renault kwid facelift launch india july 3


मुंबई, 28 जून (हिं.स.)। भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेली रेनॉल्टची एंट्री-लेव्हल हॅचबॅक क्विड 3 जुलै रोजी नव्या फेसलिफ्ट अवतारात बाजारात दाखल होणार आहे. गेल्या दशकभरापासून भारतीय बाजारात विक्री होत असलेल्या या कारने परवडणारी किंमत, एसयूव्हीसारखे आकर्षक डिझाइन आणि कमी देखभाल खर्चाच्या जोरावर ग्राहकांची पसंती मिळवली आहे. आता कंपनी या मॉडेलला अधिक आधुनिक स्वरूप देत त्याचे फेसलिफ्ट व्हर्जन सादर करण्याच्या तयारीत आहे.

कंपनीने अद्याप नव्या क्विडबाबत अधिकृत माहिती जाहीर केलेली नसली तरी टेस्टिंग दरम्यान समोर आलेल्या स्पाय शॉट्समधून काही महत्त्वाचे बदल स्पष्ट झाले आहेत. नव्या मॉडेलमध्ये सुधारित फ्रंट ग्रिल, नवीन डिझाइनचे बंपर, आकर्षक एलईडी लायटिंग एलिमेंट्स आणि अपडेटेड टेल लॅम्प्स पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नव्या क्विडचे डिझाइन रेनॉल्टच्या जागतिक डिझाइन भाषेशी सुसंगत ठेवण्यात आले असून डासिया स्प्रिंग ईव्हीपासून प्रेरणा घेतल्याचे मानले जात आहे. हे बदल कारला अधिक स्टायलिश आणि आधुनिक लूक देतील.

कारच्या इंटीरियरमध्येही काही महत्त्वाच्या सुधारणा अपेक्षित आहेत. मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सुधारित डॅशबोर्ड लेआउट आणि अधिक दर्जेदार मटेरियलचा वापर करण्यात येऊ शकतो. त्यामुळे केबिनचा अनुभव अधिक प्रीमियम आणि आरामदायी होण्याची शक्यता आहे. एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये वाढती स्पर्धा लक्षात घेता हे बदल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

फेसलिफ्ट मॉडेलमध्ये इंजिन आणि पॉवरट्रेनमध्ये कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही. सध्याचे 1.0 लिटर, तीन सिलेंडर, नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिनच कायम ठेवले जाईल. हे इंजिन 65 बीएचपीची शक्ती आणि 96 एनएम टॉर्क निर्माण करते. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी गिअरबॉक्सचे पर्यायही उपलब्ध राहतील. उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता आणि कमी देखभाल खर्चामुळे क्विड शहरातील दैनंदिन वापरासाठी आजही लोकप्रिय पर्याय मानली जाते.

फेसलिफ्टनंतर रेनॉल्ट क्विडची स्पर्धा मारुती सुझुकी अल्टो के10 आणि सेलेरियो सारख्या मॉडेल्सशी कायम राहणार आहे. नव्या डिझाइन आणि अद्ययावत फीचर्सच्या जोरावर रेनॉल्ट भारतीय बाजारातील आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. किफायतशीर कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी नव्या क्विडचा पर्याय अधिक आकर्षक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande