बीडब्ल्यूएफ यूएस ओपन: किदाम्बी श्रीकांत अंतिम फेरीत, देविका आणि रौनकचे आव्हान संपुष्टात
वॉशिंग्टन, 28 जून (हिं.स.)भारताच्या किदाम्बी श्रीकांतने बीडब्ल्यूएफ यूएस ओपन २०२६ च्या उपांत्य फेरीत जपानच्या चौथ्या मानांकित युदाई ओकिमोतोचा २२-२०, १५-२१, २१-१९ असा पराभव केला. आणि यावर्षी प्रथमच एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश के
किदाम्बी श्रीकांत


वॉशिंग्टन, 28 जून (हिं.स.)भारताच्या किदाम्बी श्रीकांतने बीडब्ल्यूएफ यूएस ओपन २०२६ च्या उपांत्य फेरीत जपानच्या चौथ्या मानांकित युदाई ओकिमोतोचा २२-२०, १५-२१, २१-१९ असा पराभव केला. आणि यावर्षी प्रथमच एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने हा सामना एक तास आणि १२ मिनिटांत जिंकला.

पहिल्या गेममध्ये श्रीकांतने १७-११ अशी आघाडी घेतली होती. पण, ओकिमोतोने शानदार पुनरागमन करत गेम पॉइंट मिळवला. मात्र, या भारतीय बॅडमिंटनपटूने दबावाखाली आपला संयम राखला आणि सलग दोन गुण मिळवून पहिला गेम २२-२० असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये, जपानी बॅडमिंटनपटूने पुनरागमन करत २१-१५ असा विजय मिळवला आणि सामना निर्णायक गेममध्ये नेला. तिसऱ्या गेममध्येही श्रीकांतने सुरुवातीलाच आघाडी घेतली, पण ओकिमोतोने १२-१२ अशी बरोबरी साधली. त्यानंतर श्रीकांतने सलग सहा गुण मिळवून सामन्यावरील आपली पकड अधिक घट्ट केली. अखेरीस, त्याने आपल्या अनुभवाचा प्रभावीपणे वापर करत २१-१९ ने सामना जिंकला.

अंतिम फेरीत श्रीकांतचा सामना चायनीज तैपेईच्या सु ली यांगशी होईल. दुसऱ्या उपांत्य फेरीत सु ने युवा भारतीय बॅडमिंटनपटू रौनक चौहानला सरळ गेममध्ये २१-१७, २१-१९ असे पराभूत केले. रौनक चौहानने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. भारताच्या शंकर सुब्रमण्यमला पराभूत करण्यापूर्वी त्याने आपले दोन्ही पात्रता सामने जिंकले होते. त्यानंतर त्याने जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या चाऊ टिएन चेनला २१-१७, २६-२४ असे पराभूत करत एक मोठा धक्का दिला. उपांत्यपूर्व फेरीत त्याने मिशा झिल्बरमनला हरवले, पण उपांत्य फेरीत सलग सामने खेळल्यामुळे आलेल्या थकव्याचा परिणाम त्याच्या प्रभावी कामगिरीवर झाला.

महिला एकेरीमध्ये, भारताच्या देविका सिहागने दुसरी मानांकित डेन्मार्कच्या लाइन क्रिस्टोफरसेनविरुद्ध पहिला गेम २१-१५ ने जिंकून जोरदार सुरुवात केली. पण, डॅनिश बॅडमिंटनपटूने पुनरागमन करत पुढील दोन गेम २१-११ आणि २१-१५ ने जिंकले. या पराभवामुळे देविकाचा प्रवास संपुष्टात आला, तर क्रिस्टोफरसेनने गेल्या वर्षीच्या मकाऊ ओपननंतर प्रथमच बीडब्ल्यूएफ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande