
मुंबई, 29 जून (हिं.स.)। जुलै महिन्याच्या सुरुवातीला बँक व्यवहारांचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. येत्या जुलै महिन्यात देशभरात तसेच विविध राज्यांमध्ये एकूण 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये रविवार, दुसरा व चौथा शनिवार तसेच प्रादेशिक सण आणि विशेष स्थानिक दिनांचा समावेश आहे. त्यामुळे बँकेत प्रत्यक्ष जाऊन होणारी कामे आधीच नियोजन करून पूर्ण करणे आवश्यक ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 5 जुलै रोजी रविवार असल्यामुळे देशभरात बँका बंद राहतील. 6 जुलै रोजी मिझोराममधील आयझॉल येथे MHIP दिवसानिमित्त सुट्टी असेल. 9 जुलै रोजी शिलाँगमध्ये बेहदिएनखलाम सणामुळे बँक व्यवहार ठप्प राहतील. 11 जुलै रोजी दुसरा शनिवार आणि 12 जुलै रोजी रविवार असल्याने देशभरात बँका बंद राहतील. त्यानंतर 16 जुलै रोजी रथ यात्रा, कांग आणि हरेला या सणांमुळे भुवनेश्वर, देहरादून आणि इंफाल येथे बँका बंद राहतील. 17 जुलै रोजी तिरोत सिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिलाँगमध्ये सुट्टी असेल. 18 जुलै रोजी गंगटोकमध्ये द्रुक्पा त्शे जी पर्वामुळे बँका बंद राहतील. 19 जुलै रोजी पुन्हा रविवार असल्याने देशभरात बँक व्यवहार थांबतील. 22 जुलै रोजी अगरतळा येथे खारची पूजा असल्याने स्थानिक सुट्टी असेल. 25 जुलै रोजी चौथा शनिवार आणि 26 जुलै रोजी रविवार असल्याने देशभरात बँका बंद राहतील. अशा प्रकारे महिनाभरात विविध कारणांमुळे बँक व्यवहारांवर परिणाम दिसून येणार आहे.
बँका बंद असल्या तरी ग्राहकांना घाबरण्याची गरज नाही कारण डिजिटल सेवा मात्र सुरळीत सुरू राहणार आहेत. यामध्ये UPI, नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग तसेच विविध अॅप्सच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. पैसे ट्रान्सफर करणे, बिल भरणे किंवा ऑनलाइन खरेदी यासारखी कामे सहज पूर्ण होऊ शकतील.
रोख रक्कम जमा करण्याची गरज असल्यास ग्राहक बँकेबाहेरील कॅश डिपॉझिट मशीनचा वापर करू शकतात. या सुविधेमुळे बँक शाखा बंद असतानाही खात्यात पैसे जमा करणे शक्य होते. त्यामुळे जुलै महिन्यात बँक सुट्ट्यांचे दिवस लक्षात घेऊन आर्थिक व्यवहारांचे योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule