
लंडन , 29 जून (हिं.स.)।युरोपमध्ये सध्या विक्रमी उष्णतेची लाट धडकली असून, तिचा फटका लाखो नागरिकांना बसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीनुसार, २१ जूनपासून युरोपमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे १,३०० हून अधिक अतिरिक्त मृत्यू नोंदवले गेले आहेत. खंडातील अनेक भागांमध्ये तापमान विक्रमी पातळीवर पोहोचल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला असून, अनेक देशांमध्ये मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे.ही जीवघेणी उष्णतेची लाट आता वेगाने पूर्व युरोपकडे सरकत आहे.
फ्रान्सच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपासून देशात अपेक्षेपेक्षा सुमारे १,००० अधिक मृत्यू नोंदवले गेले आहेत. सप्ताहात नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत असून, अनेक देशांनी आरोग्य सुविधा क्षमतेच्या मर्यादेपर्यंत पोहोचल्याचा इशारा दिला आहे.
डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देताना सांगितले की, युरोपमध्ये उच्च तापमानाशी संबंधित १,३०० हून अधिक अतिरिक्त मृत्यू झाले आहेत. त्यांनी उष्णतेमुळे शरीरावर होणाऱ्या तीव्र ताणाला “सायलेंट किलर” (मूक घातक) असे संबोधले. तसेच, युरोपमधील घरे, कार्यालये आणि शाळा इतक्या तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वृत्तानुसार, रविवारी युरोपमधील किमान १९.१ कोटी लोकांनी ३५ अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा अधिक तापमानाचा सामना केला. विशेषतः जर्मनी, झेक प्रजासत्ताक, हंगेरी आणि पोलंड या देशांमध्ये उष्णतेचा सर्वाधिक प्रभाव जाणवत आहे. ऑस्ट्रियातील स्वयंसेवी संस्था क्लायमाडॅशबोर्डने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, तुर्की वगळता युरोपमधील ३८.१ कोटी लोकांना ३० अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमानाचा सामना करावा लागणार आहे.
टेड्रोस यांनी इशारा दिला की, सध्या संपूर्ण युरोपमध्ये लाखो लोक प्रचंड उष्णतेत जीवन जगत आहेत. शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक ठिकाणी शाळा बंद ठेवाव्या लागल्या आहेत आणि वीजपुरवठा व्यवस्थेवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. ते म्हणाले, “हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीमुळे पूर्वी पिढीतून एकदाच अनुभवायला मिळणारी उष्णतेची लाट आता जवळपास दरवर्षीच येऊ लागली आहे.”त्यांनी यावरही भर दिला की, युरोप हा पृथ्वीवरील सर्वात वेगाने तापमान वाढणारा खंड असून, येथे तापमान जागतिक सरासरीपेक्षा दुप्पट वेगाने वाढत आहे.
अत्यंत उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक धोक्यांचा सामना करण्यासाठी डब्ल्यूएचओ आपल्या सदस्य देशांबरोबर आणि भागीदार संस्थांसोबत समन्वयाने काम करत आहे. संघटनेचे मुख्य लक्ष आपत्कालीन तयारी, बचावात्मक उपाययोजना आणि आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर असून, भविष्यात अशा संकटांमुळे होणारे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode