
नवी दिल्ली, 29 जून (हिं.स.) लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकमधील क्रिकेट स्पर्धेसाठी पात्रता नियम जाहीर करण्यात आले आहेत. पुरुष आणि महिला या दोन्ही गटांमध्ये एकूण सहा संघ सहभागी होतील. क्रिकेट सामने २२ ते २९ जुलै २०२८ दरम्यान खेळले जातील आणि अंतिम सामना २९ जुलै रोजी होणार आहे. हे सामने टी-२० फॉरमॅटमध्ये खेळले जातील. १२८ वर्षांनंतर क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन झाले आहे. २९ जून रोजी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) क्रिकेट स्पर्धेसाठी सहा संघ कसे निश्चित केले जातील, हे जाहीर केले.
आयओसीने सांगितले की, चारही खंडांमधील आयसीसी टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या संघाला थेट प्रवेश मिळेल. हे संघ ३१ डिसेंबर २०२६ रोजीच्या आयसीसी क्रमवारीनुसार निश्चित केले जातील. यानुसार, आशिया, युरोप, आफ्रिका आणि ओशनियामधून प्रत्येकी एक संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरेल. याचा अर्थ असा की, आशियामधून भारत, आफ्रिकामधून दक्षिण आफ्रिका, युरोपमधून इंग्लंड आणि ओशिनियामधून ऑस्ट्रेलिया यांना थेट प्रवेश मिळेल. इंग्लंडचा संघ 'ग्रेट ब्रिटन' या नावाने ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे. यामध्ये इंग्लंड, आयर्लंड आणि वेल्समधील क्रिकेटपटूंचा समावेश असेल. यजमान देश म्हणून अमेरिकेला स्थान मिळेल, पण त्यासाठी त्यांना टी-२० क्रमवारीत अव्वल १५ मध्ये राहण्याची अट असणार आहे.
ऑलिम्पिकसाठीचा सहावा क्रिकेट संघ २०२७ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक ग्लोबल क्वालिफिकेशन टूर्नामेंटमधून निश्चित केला जाईल. आधीच पात्र ठरलेल्या संघांनंतर, टी-२० क्रमवारीतील अव्वल आठ संघ सहभागी होतील. जर वेस्ट इंडिजचा संघही अव्वल आठमध्ये राहिला, तर आयसीसी 'वेस्ट इंडिज नेशन्स रिजनल टूर्नामेंट' नावाची स्पर्धा आयोजित करेल, जी त्या प्रदेशातील कोणता संघ ग्लोबल क्वालिफायरमध्ये खेळेल हे ठरवणार आहे.
महिलांच्या गटात, चार संघांना आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ मधून थेट प्रवेश मिळणार आहे. हे संघ देखील खंडानुसार निश्चित केले जातील. एक संघ हा यजमान असेल. तर अंतिम स्थान जागतिक पात्रता फेरीतील संघाला मिळणार आहे. या स्पर्धेची वेळ अद्याप निश्चित झालेली नाही.
आयओसीने असेही म्हटले आहे की, प्रत्येक संघ आपल्या ऑलिम्पिक संघात जास्तीत जास्त १५ क्रिकेटपटूंचा समावेश करू शकतो. संघात १५ वर्षांखालील कोणत्याही क्रिकेटपटूंचा समावेश केला जाऊ शकत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे