
इस्लामाबाद, 29 जून (हिं.स.)।पाकिस्तानने रविवारी अफगाणिस्तान सीमेलगतच्या भागात मोठी दहशतवादविरोधी मोहीम राबवल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी सरकारच्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रथम जमिनीवरून कारवाई करण्यात आली. त्यानंतर दहशतवाद्यांच्या तळांवर अचूक हवाई हल्ले करण्यात आले. या कारवाईत २९ दहशतवादी ठार झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सांगितले की, देशभरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. त्यांनी सांगितले की, मिळालेल्या गुप्तचर माहितीच्या आधारे अफगाणिस्तानातील पक्तिया, पक्तिका आणि कुनार प्रांतांमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर अचूक हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये २५ दहशतवादी ठार झाले असून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा नष्ट करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई जमात-उल-अहरार आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) शी संबंधित तळांना लक्ष्य करून करण्यात आली. पाकिस्तान टीटीपीला फितना अल-खवारिज या नावाने संबोधतो.या कारवाईवर अफगाणिस्तानकडून तातडीने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
ही मोहीम अशा वेळी राबवण्यात आली, जेव्हा शनिवारी रात्री कराची येथे पाकिस्तान रेंजर्सच्या प्रादेशिक मुख्यालयावर सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन सैनिकांचा मृत्यू झाला होता. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल तीन दहशतवाद्यांना ठार केले, तर जखमी अवस्थेतील एका हल्लेखोराला अटक केली. त्याची ओळख अफगाणिस्तानचा नागरिक म्हणून पटली आहे. या हल्ल्याची जबाबदारी जमात-उल-अहरार या संघटनेने स्वीकारली आहे.
गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमध्ये पोलीस आणि सुरक्षा दलांवरील दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तान या हल्ल्यांसाठी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि त्याच्याशी संबंधित संघटनांना जबाबदार धरतो. इस्लामाबादचा आरोप आहे की, अफगाणिस्तानातील तालिबान सरकार टीटीपीच्या दहशतवाद्यांना आपल्या देशात आश्रय देते आणि तेथूनच ते पाकिस्तानमध्ये हल्ले घडवून आणतात. मात्र, काबूलने हे आरोप सातत्याने फेटाळून लावले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode