
आगामी ६ जुलै रोजी लिस्टिंगची शक्यता
नवी दिल्ली, 29 जून (हिं.स.)। ड्रायफ्रूट्स, नट्स, बेरीज आणि सीड्सच्या व्यवसायात कार्यरत असलेल्या एडॉन अॅग्रो कमोडिटीज लिमिटेडचा 44.03 कोटी रुपयांचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला आहे. या आयपीओसाठी 1 जुलैपर्यंत अर्ज करता येणार असून त्यानंतर 2 जुलै रोजी शेअर्सचे वाटप होणार आहे. वाटप झालेले शेअर्स 3 जुलैला गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात जमा केले जातील, तर कंपनीचे शेअर्स 6 जुलै रोजी बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. आयपीओच्या पहिल्याच दिवशी या इश्यूला 48 टक्के प्रतिसाद मिळाला आहे.
कंपनीने प्रति शेअर 66 ते 70 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला असून एका लॉटमध्ये 2,000 शेअर्स ठेवले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान दोन लॉट म्हणजेच 4,000 शेअर्ससाठी अर्ज करावा लागणार असून त्यासाठी सुमारे 2.80 लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. या सार्वजनिक इश्यूअंतर्गत 10 रुपये दर्शनी मूल्याचे एकूण 62.90 लाख नवीन शेअर्स जारी करण्यात येणार आहेत.
या आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 1.02 टक्के, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 47.06 टक्के, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 46.90 टक्के आणि मार्केट मेकरसाठी 5.02 टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. या इश्यूसाठी गॅलेक्टिको कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड ही बुक रनिंग लीड मॅनेजर असून केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. श्रेणी शेअर्स लिमिटेड ही कंपनीची मार्केट मेकर आहे.
कंपनीच्या आर्थिक कामगिरीत गेल्या काही वर्षांत सातत्याने सुधारणा झाल्याचे दिसून येते. 2022-23 या आर्थिक वर्षात केवळ 9 लाख रुपयांचा निव्वळ नफा असलेल्या कंपनीने 2023-24 मध्ये 1.79 कोटी रुपये आणि 2024-25 मध्ये 7.22 कोटी रुपयांचा नफा नोंदवला. 2025-26 या आर्थिक वर्षातील एप्रिल 2025 ते 31 जानेवारी 2026 या दहा महिन्यांतच कंपनीने 21.55 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
महसुलातही मोठी वाढ झाली असून 2022-23 मध्ये 22.33 कोटी रुपयांवर असलेला महसूल 2023-24 मध्ये 72.92 कोटी आणि 2024-25 मध्ये 103.04 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या दहा महिन्यांत कंपनीने 287.33 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. कंपनीची नेटवर्थ, राखीव निधी आणि ईबीआयटीडीएमध्येही उल्लेखनीय वाढ झाली असली तरी कर्जाची रक्कम काही काळ चढ-उतारानंतर 10.19 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मजबूत आर्थिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर हा आयपीओ गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule