
मुंबई, 29 जून (हिं.स.)। सॅमसंगने भारतीय बाजारात आपल्या मिड-रेंज स्मार्टफोन पोर्टफोलिओचा विस्तार करत नवीन सॅमसंग गॅलेक्सी M47 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. युवा ग्राहक, गेमिंगची आवड असलेले वापरकर्ते आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी तसेच सुरळीत कामगिरी अपेक्षित असलेल्या ग्राहकांना लक्षात घेऊन हा स्मार्टफोन तयार करण्यात आला आहे. आकर्षक डिझाइन, दमदार प्रोसेसर आणि आधुनिक फीचर्समुळे हा फोन या किंमत श्रेणीत स्पर्धात्मक पर्याय ठरण्याची शक्यता आहे. सॅमसंग गॅलेक्सी M47 5G हा स्मार्टफोन रॉग रेड आणि ब्लेझ ब्लू या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. कूपन ऑफरसह त्याची प्रारंभिक प्रभावी किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली असून 4 जुलैपासून अमेझॉन प्राइम डे सेलमध्ये त्याची विक्री सुरू होणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी M47 5G मध्ये 4nm आर्किटेक्चरवर आधारित क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६ जनरेशन ३ प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबत LPDDR5X रॅम आणि UFS 3.1 स्टोरेजचा वापर करण्यात आला असून त्यामुळे एप्स जलद उघडतात, मल्टिटास्किंग अधिक सुरळीत होते आणि गेमिंगदरम्यान चांगली कामगिरी मिळते. विशेष म्हणजे या फोनमध्ये गेमर्ससाठी ‘बायपास चार्जिंग’ हे फीचर देण्यात आले आहे. या तंत्रज्ञानामुळे चार्जरमधील वीज थेट प्रोसेसरपर्यंत पोहोचते आणि बॅटरीवर अतिरिक्त ताण येत नाही. त्यामुळे गेम खेळताना फोन कमी तापतो आणि थर्मल थ्रॉटलिंगची समस्या कमी होते.
फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून तो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. 1400 निट्स पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्लसचे संरक्षण असल्याने स्क्रीन अधिक मजबूत आणि वापरण्यास सोयीस्कर ठरते. या स्मार्टफोनमध्ये 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली असून ती 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मात्र कंपनी बॉक्समध्ये चार्जर देत नसल्याने ग्राहकांना तो स्वतंत्रपणे खरेदी करावा लागणार आहे.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा OIS सपोर्ट असलेला मुख्य कॅमेरा, 5 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12 मेगापिक्सेलचा HDR फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. याशिवाय कमी प्रकाशात अधिक स्पष्ट फोटो टिपण्यासाठी नाइटोग्राफी फीचरही देण्यात आले आहे.
हा स्मार्टफोन अँड्रॉइड 16 आधारित One UI 8.5 वर चालतो. कंपनीने या फोनसाठी तब्बल सहा वर्षे प्रमुख अँड्रॉइड अपडेट्स आणि सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच गूगल जेमिनी इंटिग्रेशन, सर्कल टू सर्च, सॅमसंग वॉलेट आणि नॉक्स वॉल्ट सुरक्षा यांसारखी आधुनिक फीचर्सही यात समाविष्ट करण्यात आली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule