शेअर बाजाराला नफावसुलीचा फटका; सेन्सेक्स ३७२ अंकांनी घसरला
नवी दिल्ली, 29 जून (हिं.स.)। आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजाराने सकारात्मक सुरुवात केली होती. सकाळच्या सत्रात खरेदीचा जोर कायम राहिल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीने वाढ नोंदवली. मात्र दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीपूर्वीच गुंतवणूकदारांनी
Stock Market Closing


नवी दिल्ली, 29 जून (हिं.स.)। आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजाराने सकारात्मक सुरुवात केली होती. सकाळच्या सत्रात खरेदीचा जोर कायम राहिल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीने वाढ नोंदवली. मात्र दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीपूर्वीच गुंतवणूकदारांनी नफावसुलीला सुरुवात केली आणि बाजाराची दिशा बदलली. वाहन, आयटी आणि तेल-गॅस क्षेत्रातील समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याने बाजारावर दबाव वाढला. इंडिया व्होलॅटिलिटी इंडेक्समध्ये झालेल्या वाढीमुळेही गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले.

दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्सने सुरुवातीला वाढ घेतली होती, मात्र त्यानंतर तो ६०० हून अधिक अंकांनी घसरला. अखेरीस सेन्सेक्स ३७२.१० अंकांच्या घसरणीसह ७६,७२८.३७ अंकांवर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीनेही सुरुवातीला तेजी दाखवली, पण नंतर विक्रीच्या दबावामुळे तो १०९.७५ अंकांनी घसरून २३,९४६.२५ अंकांवर स्थिरावला.

बँकिंग, ग्राहक टिकाऊ वस्तू, एफएमसीजी आणि टेक क्षेत्रातील निर्देशांकही घसरणीसह बंद झाले. मात्र सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, धातू आणि कॅपिटल गुड्स क्षेत्रातील समभागांनी काही प्रमाणात सकारात्मक कामगिरी केली. व्यापक बाजारातही दबाव कायम राहिला. मिडकॅप निर्देशांकात ०.३७ टक्के, तर स्मॉलकॅप निर्देशांकात ०.६२ टक्क्यांची घसरण झाली.

बाजारातील या घसरणीचा थेट परिणाम गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर झाला. बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ४७३.९० लाख कोटी रुपयांवर घसरले. मागील व्यवहाराच्या तुलनेत सुमारे ७२ हजार कोटी रुपयांची संपत्ती कमी झाली. दिवसभरात बीएसई आणि एनएसईवर घसरणाऱ्या समभागांची संख्या वाढणाऱ्या समभागांपेक्षा लक्षणीय जास्त होती, त्यामुळे बाजारातील नकारात्मक वातावरण स्पष्टपणे दिसून आले. व्यवहाराच्या अखेरीस काही प्रमाणात खरेदी झाली असली तरी ती घसरण रोखण्यासाठी अपुरी ठरली.

दिवसभराच्या खरेदी-विक्रीनंतर, शेअर बाजारातील आघाडीच्या शेअर्सपैकी, मॅक्स हेल्थकेअर २.३६ टक्के, कोल इंडिया २.१७ टक्के, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज १.८७ टक्के, इटरनल १.६७ टक्के आणि ट्रेंट लिमिटेड १.३१ टक्क्यांनी वाढले आणि आजच्या टॉप ५ गेनर्सच्या यादीत सामील झाले. दुसरीकडे, कोटक महिंद्रा (३.३० टक्के घसरण), महिंद्रा अँड महिंद्रा (२.८० टक्के घसरण), अदानी एंटरप्रायझेस (२.४९ टक्के घसरण), इंटर ग्लोब एव्हिएशन (२.४७ टक्के घसरण) आणि मारुती सुझुकी (२.४२ टक्के घसरण) हे आजच्या सर्वाधिक घसरण झालेल्या ५ कंपन्यांमध्ये होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande