
काराकास , 29 जून (हिं.स.)।व्हेनेझुएलात झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपांमध्ये आतापर्यंत १,४०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. भूकंपांनंतर चार दिवस उलटूनही मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक तसेच परदेशी बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना जिवंत बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत.
सरकारच्या माहितीनुसार, रविवारी दुपारपर्यंत मृतांचा आकडा १,४५० वर पोहोचला असून हजारो नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकारच्या मदतकार्याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेकांचे म्हणणे आहे की, सुरुवातीच्या टप्प्यातील बचावकार्य सामान्य नागरिक आणि स्वयंसेवकांच्या भरोशावर चालले, तर सरकारी मदत उशिराने पोहोचली. बेपत्ता नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी अनेक कुटुंबे विविध ऑनलाइन आणि स्थानिक डेटाबेसचा आधार घेत आहेत. मदत संस्थांच्या मते, कोणत्याही नैसर्गिक आपत्तीनंतर पहिले ४८ ते ७२ तास जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. मात्र, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना पाणी किंवा अन्न मिळाल्यास त्यांचे आणखी काही दिवस जिवंत राहण्याची शक्यता असते. दरम्यान रविवारी सकाळी अमेरिका आणि फ्रान्सच्या बचाव पथकांनी ढिगाऱ्यातून एका व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला सुखरूप बाहेर काढले. हे दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला.
संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) माहितीनुसार, शनिवारीपर्यंत जगातील विविध देशांतील २,२०० हून अधिक बचाव कर्मचारी व्हेनेझुएलात दाखल झाले असून आणखी पथके तेथे पोहोचत आहेत. अमेरिका, फ्रान्स, मेक्सिको, ब्राझील आणि एल साल्वाडोरसह अनेक देशांनी मदत आणि बचावकार्यासाठी आपली पथके पाठवली आहेत. तर भारताच्या ‘ऑपरेशन अमिस्ताद’ अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलासाठी पाठवलेली मदत, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि भारतीय लष्कराचे फील्ड हॉस्पिटल पथक देखील तेथे दाखल झाले आहे.
सरकारने ला ग्वायरा राज्यात १४ हजारांहून अधिक लष्करी आणि पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. आपत्तीग्रस्त भागात प्रवेश करण्यासाठी विशेष परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, अनेक स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की सरकारी मदत अद्यापही अपुरी आहे. सरकारच्या माहितीनुसार, भूकंपामुळे ७७० हून अधिक इमारती पूर्णपणे किंवा अंशतः कोसळल्या आहेत. शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीच्या तुलनेत हा आकडा जवळपास दुप्पट आहे. अनेकजण अजूनही उद्ध्वस्त घरांजवळ उभे राहून आपल्या नातेवाईकांची नावे हाक मारत आहेत.
तीव्र उष्णता आणि मृतदेह कुजण्यास सुरुवात झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सुरक्षेसाठी आवश्यक उपकरणांची कमतरता असल्याने अनेक स्वयंसेवक मोटारसायकलचे हेल्मेट घालून ढिगाऱ्यात बचावकार्य करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून लहान-मोठे धक्केही जाणवत असून शनिवारी ४.८ रिश्टर तीव्रतेचा आफ्टरशॉकही नोंदवण्यात आला. भूकंपामुळे राजधानी कराकासमधील सिमोन बोलिव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळालाही मोठे नुकसान झाले आहे. विमानतळावरील एक धावपट्टी कार्यरत ठेवण्यात आली असून अमेरिकेचे तज्ज्ञ तिच्या दुरुस्तीचे काम करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode