
मुंबई, 29 जून (हिं.स.)। लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत असलेला आगामी ईठा हा सिनेमा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. नुकताच प्रदर्शित झालेला टीझर व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली असतानाच, तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी या सिनेमावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारत असल्याची चर्चा आहे. मात्र टीझरमधील काही दृश्ये आणि सिनेमाच्या नावावरून वाद निर्माण झाला आहे.
विठाबाई नारायणगावकर यांचे पुत्र कैलास नारायणगावकर यांनी एका यूट्यूब मुलाखतीत बोलताना सांगितले की, या सिनेमाबाबत कुटुंबाला फक्त एका आठवड्यापूर्वी माहिती मिळाली. टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही गोष्टींवर त्यांनी आक्षेप घेतला असून, आईच्या वैयक्तिक आयुष्याचे आणि संघर्षाचे चित्रण अधिक अचूक व सविस्तर पद्धतीने करायला हवे होते, असे त्यांनी म्हटले. तसेच सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी कुटुंबाला दाखवण्यात यावा, जेणेकरून काही आक्षेपार्ह बाबी असतील तर त्या दूर करता येतील, अशी त्यांची मागणी आहे.
त्याचबरोबर नातू मोहित नारायणगावकर यांनी सिनेमाच्या नावावरूनही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘ईठा’ हे नाव बदलून ‘विठा’ ठेवावे किंवा पूर्ण नाव ‘विठाबाई नारायणगावकर’ वापरावे, अशी त्यांची मागणी आहे. तसेच तमाशा परंपरेतील कलाकारांच्या नावासोबत गावाचे नाव जोडले जाणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिनेमात वापरलेली काही माहिती आणि एका पुस्तकावर आधारित कथनही चुकीचे असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
कुटुंबीयांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, २ ते ३ जुलैपर्यंत निर्मात्यांनी संपर्क साधला नाही तर ते कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबतील. यापूर्वी मेलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी सांगितले असून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, अशी त्यांची तक्रार आहे. जर संवाद झाला तर सिनेमाला सहकार्य करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे, मात्र आक्षेपार्ह बाबी असल्यास न्यायालयीन मार्ग स्वीकारला जाईल असा ठाम इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित हा सिनेमा रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला असून पुढे या वादावर निर्माते आणि कुटुंबीय यांच्यात काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule