
पाटणा, ३ जून (हिं.स.) । बिहारची राजधानी पाटणा येथील खान सरांच्या कोचिंग सेंटरवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये ज्ञान बिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद आणि त्याचे दोन साथीदार अभिषेक व गौरव यांचा समावेश आहे. पोलीस तिघांचीही सतत चौकशी करत असून सखोल तपास सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तपासादरम्यान मिळालेल्या महत्त्वाच्या सुगाव्यांच्या आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे ज्ञान बिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद आणि त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतरच्या चौकशीनंतर आणि पुराव्यांची पडताळणी झाल्यावर तिघांनाही औपचारिकपणे अटक करण्यात आली.
शहर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश रंजन यांनी बुधवारी या अटकेला दुजोरा दिला आणि सांगितले की, या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा तपास सुरू आहे. त्यांनी पुढे सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. पोलीस पुराव्यांच्या आधारे निःपक्षपातीपणे कारवाई करत असून, या घटनेत सामील असलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटवत आहेत.
तिन्ही आरोपींच्या अटकेनंतर शहरात या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. पण, पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, संपूर्ण कारवाई उपलब्ध पुरावे आणि तपासाच्या आधारे करण्यात आली आहे. त्यांनी असेही आश्वासन दिले आहे की, कोणत्याही निरपराध व्यक्तीला त्रास दिला जाणार नाही आणि तपासात इतरांचा सहभाग उघड झाल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल.
या प्रकरणातील एक महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोचिंग संस्थेत गोळीबार झाल्याची कोणतीही पुष्टी झालेली नाही. घटनेनंतर गोळीबाराच्या अफवा पसरल्या असूनही, पोलीस तपासात अद्याप असा कोणताही स्पष्ट पुरावा सापडलेला नाही.
बुधवारी घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खान यांनी पोलीस आणि प्रशासनाच्या कारवाईवर समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, आम्ही आतापर्यंतच्या पोलिसांच्या कारवाईवर समाधानी आहोत. वरिष्ठ पोलीस अधिकारी, इतर अधिकाऱ्यांसह, रात्रभर येथे उपस्थित होते. आमच्या सुरक्षेसाठी सुमारे ५० ते ७० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मी सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रशासनाचे आभार मानतो.
मंगळवारी संध्याकाळी काही समाजकंटकांनी कदमकुआं पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खान सरांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला केला. या समाजकंटकांनी कोचिंग सेंटरची तोडफोड केली आणि तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. जखमी सुरक्षा रक्षकावर सध्या पाटणा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (PMCH) मध्ये उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी सांगितले की, तपास वेगाने सुरू असून या घटनेत सहभागी असलेल्या इतर संशयितांना ओळखून अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाने शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आणि शैक्षणिक संस्थांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आश्वासनही दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे