
मुंबई, 03 जून (हिं.स.)।दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय, पाकिस्तानी गुंड तसेच आयएसआयचा एजंट शहजाद भट्टी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मॉड्यूलशी संबंधित आणखी एक दहशतवादी हुफैजा याला मुंबईतून अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दहशतवादी हुफैजाच्या शोधासाठी स्पेशल सेल आणि मुंबई एटीएसची पथके गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत छापेमारी करत होती. माहितीनुसार, मुन्नाचा निकटवर्तीय असलेल्या हुफैजाच्या शोधासाठी विशेष पथक मुंबईत छापा टाकत होती.हुफैजा हा मुंबईतील अंडरवर्ल्डमध्ये दाऊद इब्राहिमचा उजवा हात मानला जात असून, आयएसआयचा एजंट मुन्ना झिंगाडाचा तो जवळचा सहकारी आहे. कराचीतून मुन्ना त्याला निर्देश देत होता आणि त्यानुसार तो काम करत होता. मंगळवारी रात्री हुफैजाला मुंबईतून अटक करण्यात आली.
या मॉड्यूलशी संबंधित आतापर्यंत नऊ दहशतवाद्यांना स्पेशल सेलने चार राज्यांतून अटक केली आहे. गेल्या महिनाभरापासून गुप्तचर विभागाच्या (आयबी) माहितीनुसार विशेष पथक दिल्ली, मुंबई, राजस्थान आणि पंजाबमध्ये या मॉड्यूलशी संबंधित दहशतवाद्यांच्या शोधासाठी छापेमारी करत होती.हुफैजाच्या अटकेनंतर डी-कंपनीमध्ये आणखी किती दहशतवाद्यांची भरती करण्यात आली आहे, याबाबत त्याची चौकशी सुरू आहे. तसेच मुन्नाने त्याला कोणकोणती लक्ष्ये दिली होती, याचाही तपास केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode