
नवी दिल्ली , 03 जून (हिं.स.)।कुवेत विमानतळावरील इराणी ड्रोन हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. कुवेतमधील भारतीय दूतावासाने बुधवारी एक्सवरील पोस्टद्वारे ही माहिती दिली. इराण आणि अमेरिका यांच्यात वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ला झाला. या घटनेनंतर कुवेतने तात्पुरते आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. दरम्यान, भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने ४ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत कुवेतकडे जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या सर्व उड्डाणे स्थगित केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ प्रवासी इमारतीला ड्रोनद्वारे लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यानंतर कुवेतच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने तातडीने देशाचे हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला. कुवेत सिव्हिल एव्हिएशनने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सर्व हवाई वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली असून उड्डाणे पर्यायी विमानतळांकडे वळवण्यात येत आहेत.”
इंडिगोने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा खबरदारीचा निर्णय घेण्यात आला आहे. एअर नने म्हटले, “यामुळे प्रवाशांच्या प्रवास योजनांवर परिणाम होणार असल्याची आम्हाला जाणीव आहे आणि त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. मात्र, आमच्या ग्राहकांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.”
एअरलाइनने पुढे सांगितले की, ती या परिसरातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून संबंधित विमान वाहतूक प्राधिकरणांच्या संपर्कात आहे. परिस्थिती सुरक्षित झाल्यानंतर आणि सुरक्षित हवाई मार्ग उपलब्ध झाल्यानंतर उड्डाण सेवा पुन्हा सुरू करण्यात येतील.
इंडिगोने प्रवाशांना विमानतळाकडे रवाना होण्यापूर्वी आपल्या उड्डाणाची स्थिती (फ्लाइट स्टेटस) तपासण्याचे आवाहन केले आहे. प्रभावित प्रवाशांना रीबुकिंग किंवा संपूर्ण परतावा (फुल रिफंड) यापैकी कोणताही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode