


नवी मुंबईत, 03 जून (हिं.स.)। देशभरात वाढत्या महागाईने, इंधन दरवाढीने आणि बेरोजगारीच्या समस्येने सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाले असताना, या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नवी मुंबईत जोरदार आंदोलन करण्यात आले. सुरुवातीला शांततेत सुरू झालेल्या या आंदोलनाने पुढे आक्रमक वळण घेतले. वाढत्या महागाईविरोधात आणि केंद्र सरकारच्या कथित जनविरोधी धोरणांविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र आंदोलन अधिक तीव्र होताच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांनी रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. तसेच सक्षणा सलगर आणि रोहिणी खडसे यांनाही पोलिस वाहनात बसवून ताब्यात घेण्यात आले.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी भांडी वाजवत सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करत चूल पेटवून भाकरी थापण्याचा अनोखा मार्ग अवलंबला. यावेळी रोहित पवार हे देखील कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर बसलेले दिसून आले.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, महागाई दिवसेंदिवस वाढत असून पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅसच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक ताण वाढला आहे. त्यांच्या वतीने आवाज उठवण्यासाठी आणि सरकारपर्यंत जनतेच्या वेदना पोहोचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार ऐकेल किंवा नाही हे माहीत नसले तरी लोकांसाठी लढणे हीच आमची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी देशाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगत केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक बोलवून आर्थिक स्थितीवर सखोल चर्चा करावी, अशी मागणी केली. हा कोणत्याही पक्षाचा किंवा राजकारणाचा विषय नसून महागाईमुळे भरडल्या जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या सहा महिन्यांपासून संसदेत या विषयावर सातत्याने आवाज उठवला जात असूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आगामी विधान परिषद निवडणुकांमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला. काही नगरसेवकांना आर्थिक प्रलोभने दिली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. शिंदे यांनी आंदोलनादरम्यान पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले. मात्र, महागाई आणि शेतकरी प्रश्नांवर संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule