नाशिक टीसीएस प्रकरण : आरोपपत्रात इम्तियाज जलील यांचा उल्लेख
नाशिक, 03 जून (हि.स.) : टीसीएसच्या नाशिक कार्यालयाशी संबंधित लैंगिक छळ आणि जबरदस्तीने धर्मांतराच्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. नाशिक पोलिसांनी दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचे नाव थेट समाविष्ट झाल्याने
इम्तियाज जलील


नाशिक, 03 जून (हि.स.) : टीसीएसच्या नाशिक कार्यालयाशी संबंधित लैंगिक छळ आणि जबरदस्तीने धर्मांतराच्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. नाशिक पोलिसांनी दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचे नाव थेट समाविष्ट झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या देवलाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या या पहिल्या प्रकरणात बलात्कार, अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ऍट्रोसिटी) आणि धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. सुमारे 3,500 पानांचे हे पहिले आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. मुख्य आरोपी निदा खान हिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ती फरार झाली होती. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. तपासादरम्यान एमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल यांनी तिला लपवण्यात मदत केल्याचे समोर आले. चौकशीदरम्यान मतीन पटेल यांनी कथितपणे म्हंटले की, “यासाठी इम्तियाज जलील साहेबांना विचारावे लागेल.” त्यानंतर पोलिसांनी नारेगाव-कौसर सिडको परिसरात छापा टाकून निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले. ज्या घरात निदा खान लपून बसली होती, त्या घरासह दोन अन्य मालमत्तांवर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. या प्रकरणात घरमालक हनीफ खान यांनाही सहआरोपी बनवण्यात आले आहे.

सध्या हज यात्रेसाठी सौदी अरेबियात असलेल्या इम्तियाज जलील यांनी फोनवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मला माहिती नाही की माझे नाव आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. मी कोणत्याही तपासाला सामोरे जाण्यास तयार आहे.” जलील यांनी हेही मान्य केले की ते पीडित कुटुंबाला भेटले होते.

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande