
लातूर, 3 जून, (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, हातभट्टी व्यवसाय आणि बेकायदेशीर मद्यविक्री पूर्णपणे बंद करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस दलाने व्यापक विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत एका दिवसात ८ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३ लाख १२ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच हजारो लिटर गुळमिश्रित रसायन, कच्चा माल आणि हातभट्ट्या नष्ट करण्यात आल्या.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २ जून रोजी जिल्हाभर एकाचवेळी छापेमारी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेसह विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी अवैध दारू व्यवसायिकांविरोधात मोठी कारवाई केली.
या मोहिमेतील सर्वात मोठी कारवाई रेणापूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने वसंतनगर तांडा परिसरात केली. येथे सुरू असलेल्या हातभट्टी व्यवसायावर छापा टाकून सलग तीन गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत हजारो लिटर गुळमिश्रित रसायन, निकृष्ट दर्जाचा गुळ, दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या मोटारी, फॅन, प्लास्टिक टाक्या, रबरी ट्यूब, घागरी, पाईप तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या कारवाईतील जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख ९० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी अवैध दारू निर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या हातभट्ट्या जागेवरच उद्ध्वस्त करण्यात आल्या. तसेच दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन, कच्चा माल व इतर साहित्य पंचांसमक्ष नष्ट करण्यात आले.
जिल्हाभर झालेल्या कारवायांमध्ये एकूण ८ गुन्हे दाखल करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात अवैध दारू आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, जिल्ह्यात अवैध दारू विक्री, हातभट्टी निर्मिती आणि समाजविघातक धंद्यांविरोधातील मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार आहे. नागरिकांनी अशा अवैध व्यवसायांबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis