
परकीय चलनसाठा वाचवण्यासाठी १२ अब्ज डॉलर्सचे सोने विकल्याच्या बातम्या निराधार
नवी दिल्ली, 03 जून (हिं.स.)। भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बुधवारी अशा माध्यमांतील वृत्तांचे खंडन केले आहे, ज्यामध्ये आरबीआयने आपल्या सुवर्णसाठ्याचा काही भाग विकल्याचा दावा करण्यात आला होता. आरबीआयने स्पष्ट केले की, त्यांच्याकडे असलेल्या सोन्याचे प्रमाण ८८०.५२ टनांवर कायम असून त्यात कोणताही बदल झालेला नाही.
अमेरिकेतील माध्यम संस्था ब्लूमबर्गने दावा केला होता की, पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या परिणामामुळे परकीय चलनसाठ्याचे संरक्षण करण्यासाठी केंद्रीय बँकेने सुमारे १२ अब्ज डॉलर्स मूल्याचे सोने विकले असावे. ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सने विश्लेषणाच्या आधारे हा दावा केला होता.
केंद्रीय बँकेने अफवांपासून दूर राहण्यासाठी आणि अधिकृत माहिती मिळवण्यासाठी नेहमीच आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे. जारी केलेल्या निवेदनात आरबीआयने म्हटले आहे की, माध्यमांच्या काही घटकांमध्ये आरबीआयने सोने विकल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरबीआय यावर भर देते की या बातम्या वस्तुस्थितीला धरून नाहीत.
आरबीआयने सांगितले की, आपल्या मासिक बुलेटिनमध्ये ते सुवर्णसाठ्याची माहिती नियमितपणे प्रकाशित करते. यासंदर्भातील अद्ययावत माहिती आरबीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आजच्या तारखेपर्यंत भौतिक स्वरूपातील सुवर्णसाठा ८८०.५२ टनांवर अपरिवर्तित आहे.
दरम्यान, पत्र माहिती कार्यालयाच्या (पीआयबी) फॅक्ट चेक खात्यानेही सामाजिक माध्यमांवर या दाव्याचे खंडन केले आहे. पीआयबीने म्हटले आहे की, भारताच्या परकीय चलनसाठ्यातील सोन्याचा वाटा सप्टेंबर २०२५ अखेरीस १३.९२ टक्के होता, तो ३१ मार्च २०२६ रोजी १६.७० टक्क्यांपर्यंत वाढला आणि २२ मे २०२६ पर्यंत तो आणखी वाढून १६.८५ टक्के झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule