आदि कैलास यात्रेला विक्रमी प्रतिसाद; 33 दिवसांत 30 हजारांहून अधिक भाविकांचे दर्शन
देहरादून , 03 जून (हिं.स.)। आदि कैलास आणि ॐ पर्वत दर्शनासाठी अवघ्या 33 दिवसांत विक्रमी संख्येने भाविकांनी भेट दिली आहे. 1 मेपासून सुरू झालेल्या यात्रेत आतापर्यंत 30 हजारांहून अधिक यात्रेकरूंनी दर्शन घेतले आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत यात्रेकर
आदि कैलास यात्रेला विक्रमी प्रतिसाद; 33 दिवसांत 30 हजारांहून अधिक भाविकांचे दर्शन


देहरादून , 03 जून (हिं.स.)। आदि कैलास आणि ॐ पर्वत दर्शनासाठी अवघ्या 33 दिवसांत विक्रमी संख्येने भाविकांनी भेट दिली आहे. 1 मेपासून सुरू झालेल्या यात्रेत आतापर्यंत 30 हजारांहून अधिक यात्रेकरूंनी दर्शन घेतले आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत यात्रेकरूंची संख्या दुपटीहून अधिक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या यात्रेमुळे स्थानिकांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळत असून सरकारच्या महसुलातही मोठी भर पडत आहे.

ऑक्टोबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदि कैलासला भेट दिल्यानंतर या परिसराला देशभरात नवी ओळख मिळाली. 2024 मध्ये सुमारे चार महिने चाललेल्या यात्रेदरम्यान 29,352 यात्रेकरूंनी, तर 2025 मध्ये 36,526 यात्रेकरूंनी आदि कैलास आणि ॐ पर्वताचे दर्शन घेतले होते. यंदा या यात्रेबाबत भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. यात्रेच्या पहिल्या 33 दिवसांतच 30,016 यात्रेकरूंना परवानगीपत्रे (परमिट) जारी करण्यात आली आहेत. यात्रा संपेपर्यंत ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत दुपटीहून अधिक होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मान्सून काळात हवामानाचा विचार करून ही यात्रा काही काळासाठी स्थगित केली जाते. त्यानंतर सप्टेंबरच्या मध्यापासून पुन्हा यात्रा सुरू होऊन 30 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

आदि कैलास यात्रेमुळे सीमावर्ती भागातील नागरिकांना स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. टॅक्सी सेवा, होमस्टे, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाशी संबंधित 500 हून अधिक कुटुंबांना या यात्रेचा थेट लाभ होत आहे. स्थानिकांना रोजगार मिळण्याबरोबरच यात्रेकरूंकडून सरकारलाही मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत आहे. सुमारे 33 हजार यात्रेकरूंकडून इनर लाईन परमिट आणि वैद्यकीय तपासणी शुल्काच्या स्वरूपात सरकारला आतापर्यंत जवळपास 1.8 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. प्रत्येक यात्रेकरूला इनर लाईन परमिट आणि वैद्यकीय शुल्क म्हणून 600 रुपये भरावे लागत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande