
चंद्रपूर, 03 जून (हिं.स.) : राज्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथून ओडिशातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या ‘झिनत’ या वाघिणीने 4 शावकांना जन्म दिला आहे. या घटनेमुळे सिमलीपालमधील व्याघ्र संवर्धन आणि आनुवंशिक विविधता वाढविण्याच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून वन विभागात आनंदाचे वातावरण आहे.
सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या आनुवंशिक विविधतेत वाढ करून त्यांच्या लोकसंख्येचे भवितव्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने व्याघ्र स्थलांतर मोहीम राबविण्यात आली होती. सिमलीपाल हा देशातील महत्त्वाच्या व्याघ्र अधिवासांपैकी एक मानला जातो. येथे आढळणाऱ्या काही वाघांमध्ये विशिष्ट आनुवंशिक वैशिष्ट्यांमुळे काळसर पट्ट्यांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांना ‘मेलॅनिस्टिक टायगर’ म्हणून ओळखले जाते. अशा परिस्थितीत बाहेरील व्याघ्रांचे स्थलांतर करून आनुवंशिक विविधता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या मंजुरीनंतर ओडिशा वन विभागाने ताडोबातून वाघांचे स्थलांतर सुरू केले. या मोहिमेअंतर्गत ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 दरम्यान ‘जमुना’ आणि ‘झिनत’ या दोन वाघिणींना सिमलीपालमध्ये सोडण्यात आले होते. मात्र, स्थलांतरानंतर काही काळातच ‘झिनत’ सिमलीपालच्या बाहेर पडून झारखंड आणि पश्चिम बंगालमधील जंगलांमध्ये शेकडो किलोमीटरचा प्रवास करताना आढळली. तिच्या हालचालींनी वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले होते.
वन विभागाच्या अथक प्रयत्नांनंतर तिला पुन्हा पकडण्यात आले आणि 1 जानेवारी 2025 रोजी सिमलीपालमधील आठ हेक्टरच्या संरक्षित कुंपणात ठेवण्यात आले. काही महिन्यांच्या अनुकूलन प्रक्रियेनंतर एप्रिल 2025 मध्ये ‘झिनत’ला पुन्हा जंगलात मुक्त करण्यात आले. त्यानंतर तिने सिमलीपालच्या मुख्य क्षेत्रात स्वतःचा अधिवास निर्माण केला आणि जानेवारी २०२६ मध्ये स्थानिक नर वाघासोबत संयोग साधला.
या संयोगानंतर ‘झिनत’ने 4 निरोगी शावकांना जन्म दिला आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, शावक सध्या तीन ते चार आठवड्यांचे आहेत. गेल्या 28 मे रोजी कॅमेरा ट्रॅपमध्ये ‘झिनत’ आपल्या 4 शावकांसह दिसून आली. या दुर्मिळ दृश्यामुळे स्थलांतर प्रकल्पाच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
विशेष म्हणजे, व्याघ्र संवर्धन प्रकल्पांतर्गत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित करण्यात आलेल्या वाघिणीने नवीन अधिवासात यशस्वीपणे प्रजनन करून शावकांना जन्म देणे हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळे सिमलीपालमधील वाघांची संख्या वाढण्यास मदत होणार असून भविष्यात या परिसरातील व्याघ्रसंवर्धन अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, ‘झिनत’ची कहाणी ही केवळ एका वाघिणीची नव्हे, तर वैज्ञानिक नियोजन, वन विभागाची सातत्यपूर्ण मेहनत आणि व्याघ्र संवर्धनाच्या यशस्वी मॉडेलची प्रेरणादायी गाथा आहे. चार नव्या शावकांच्या आगमनामुळे सिमलीपालच्या जंगलात नवजीवन फुलले असून देशातील व्याघ्र संरक्षण मोहिमेला आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी