तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का; विधानसभा अध्यक्षांच्या मंजुरीनंतर ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा
कोलकाता, 03 जून (हिं.स.)। पश्चिम बंगाल विधानसभेत तृणमूल काँग्रेसमधील सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. पक्षातून निष्कासित करण्यात आलेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून मान्यत
WB Assembly Speaker Approval TMC Ritabrata Leader


कोलकाता, 03 जून (हिं.स.)। पश्चिम बंगाल विधानसभेत तृणमूल काँग्रेसमधील सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. पक्षातून निष्कासित करण्यात आलेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता देण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष रथींद्र बसू यांच्या मंजुरीनंतर विरोधी पक्षनेत्यांसाठी राखीव कक्षही उघडण्यात आला असून त्याची चावी ऋतब्रत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

ऋतब्रत बॅनर्जी यांनी दावा केला की, तृणमूलच्या तिकिटावर निवडून आलेल्या दोन-तृतीयांश आमदारांचा पाठिंबा त्यांना आहे आणि हाच गट आता विधानसभेतील तृणमूलच्या संसदीय पक्षात बहुमत राखून आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकार विरोधात प्रभावीपणे भूमिका बजावेल, असे त्यांनी सांगितले.

ऋतब्रत यांच्या मते, तृणमूलच्या ८० आमदारांपैकी ६० आमदारांनी त्यांना विरोधी पक्षनेते बनवण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. सध्या ५८ आमदारांचे लेखी समर्थन त्यांच्याकडे असून आणखी दोन आमदार राज्याबाहेर आहेत. त्यांनीही सहमती दर्शवली असून त्यांची समर्थनपत्रे मिळताच हा आकडा ६० वर पोहोचेल, असे त्यांनी म्हटले.

नवीन संघटनेची घोषणा करताना ऋतब्रत यांनी आखरुज्जामान यांची मुख्य प्रतोद (व्हीप) म्हणून नियुक्ती केल्याचे सांगितले. तसेच जावेद अहमद खान, सबीना यासमीन, शिउली साहा आणि संदीपन साहा यांची उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांच्या समर्थनासंबंधीची पत्रे विधानसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी नवान्न येथे बोलावलेल्या प्रशासकीय आढावा बैठकीसाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनाही निमंत्रित केले होते. त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. कोलकाता, हावडा आणि उत्तर २४ परगणा येथील विरोधी पक्षाचे आमदार या बैठकीत सहभागी झाले होते. सरकारच्या सकारात्मक पावलांना पाठिंबा देतानाच जनहिताच्या प्रश्नांवर विरोधी पक्ष ठामपणे आवाज उठवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, ते व्यक्तिकेंद्री नेतृत्वाच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाहीत आणि सर्व निर्णय सामूहिक चर्चेच्या आधारे घेतले जातील. तसेच तृणमूलच्या प्रमुख व माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संसदीय पक्षाच्या सल्लागाराची भूमिका स्वीकारावी, अशी विनंती करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. आपल्या गटाचा अभिषेक बॅनर्जी यांच्याशी कोणताही राजकीय संबंध नसल्याचेही ऋतब्रत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवरून वाद तेव्हा सुरू झाला, जेव्हा वरिष्ठ तृणमूल आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांना विरोधी पक्षनेते करण्याचा प्रस्ताव समोर आला. या प्रस्तावाच्या समर्थनार्थ अनेक आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचा बनावट वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी यापूर्वी दावा केला होता की, ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा यांनीच कथित स्वाक्षरी बनावट प्रकरण विधानसभा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर हेअर स्ट्रीट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला. तपास यंत्रणेने आतापर्यंत १३ आमदारांची चौकशी केली आहे.

याचदरम्यान, तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून अलीकडील संसदीय उदाहरणांचा दाखला देत शोभनदेव चट्टोपाध्याय यांनाच विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता देण्याची मागणी केली होती.

बुधवारी एका बाजूला ऋतब्रत बंद्योपाध्याय विधानसभेत आपल्या नेतृत्वाखालील गटाची ताकद दाखवत होते, तर दुसऱ्या बाजूला कालीघाट येथील निवासस्थानी ममता बॅनर्जी या वरिष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी, कुणाल घोष आणि चंद्रिमा भट्टाचार्य यांच्यासोबत बैठक घेत होत्या. या घडामोडींमुळे तृणमूल काँग्रेसमधील वाढते मतभेद आणि नेतृत्वासाठीचा संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande