
कोलकाता, 03 जून (हिं.स.)। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत कलह थांबण्याऐवजी अधिकच वाढत असल्याचे दिसून येत आहे. नव्या घडामोडीत पक्षातील बंडखोर आमदारांनी पश्चिम बंगाल विधानसभा अध्यक्ष रथींद्र बसू यांना पत्र पाठवून मोठा राजकीय डाव टाकला आहे. बंडखोर गटाने दावा केला आहे की, ५८ आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या पत्राद्वारे ऋतब्रत बॅनर्जी यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या पत्रात केवळ विरोधी पक्षनेतेपदासाठीच नव्हे तर उपनेते आणि मुख्य सचेतक पदांसाठीही नावे सुचविण्यात आली आहेत. उपनेते म्हणून संदीपन साहा, जावेद खान आणि शिउली साहा यांची नावे प्रस्तावित करण्यात आली आहेत, तर मुख्य सचेतकपदासाठी आखरुज्जमान यांचे नाव सुचविण्यात आले आहे.
मात्र, विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून अद्याप या पत्राची अधिकृत स्वीकृती मिळाल्याची पुष्टी करण्यात आलेली नाही. हे पत्र स्वीकारले गेल्यास, उलुबेरिया मतदारसंघातील तृणमूलचे आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांना औपचारिकरीत्या विरोधी पक्षनेत्याचा दर्जा मिळू शकतो. विशेष म्हणजे, बंडखोर आमदारांनी आपल्या पत्रात ममता बॅनर्जी यांचाच पक्षाच्या सभानेत्री म्हणून उल्लेख केला आहे.
प्रत्यक्षात, कथित स्वाक्षरी बनावट प्रकरण उघडकीस आल्यानंतर तृणमूल काँग्रेसमधील मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. हा वाद त्या प्रस्तावपत्रापासून सुरू झाला होता, ज्यामध्ये ज्येष्ठ नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करण्याची शिफारस करण्यात आली होती. या प्रस्तावपत्रात अनेक आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचा बनावट वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.
मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी दावा केला होता की, ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा यांनी सर्वप्रथम विधानसभेला कथित स्वाक्षरी बनावट प्रकरणाची माहिती दिली होती. त्यानंतर हेअर स्ट्रीट पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आणि प्रकरणाचा तपास सुरू झाला. तपासात सीआयडीदेखील पोलिसांना मदत करत असून, आतापर्यंत १३ आमदारांची चौकशी करण्यात आली आहे.
या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या शक्यतेबाबतच्या चर्चा अधिक तीव्र झाल्या आहेत. ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर असंतुष्ट आमदारांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. अनेक आमदारांनी पक्ष नेतृत्वाविरोधात उघडपणे भूमिका घेतली असून, त्यामुळे संघटनेतील संकट अधिक गडद झाले आहे.
राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, बंडखोर आमदार स्वतःला “नवी तृणमूल” म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, भविष्यात पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह कोणत्या गटाकडे राहणार, याबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
दरम्यान, मंगळवारी तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांनीही विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवून शोभनदेव चट्टोपाध्याय यांना तातडीने विरोधी पक्षनेत्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. मात्र, त्यावेळी अध्यक्ष रथींद्र बसू कोलकात्यात उपस्थित नसल्यामुळे पत्र स्वीकारले जाऊ शकले नव्हते. बुधवारी अध्यक्ष विधानसभेत दाखल झाल्यानंतर या संपूर्ण घडामोडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule