
मुंबई, 03 जून, (हिं.स.)। भारत - म्यानमार दोन्ही देशांना वसाहत बनवण्यात आले होते. मात्र, स्वातंत्र्यपूर्व, तसेच त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात देखील उभय देशांमधील संबंध कायम घनिष्ट आहेत. या संबंधांना नव्याने चालना देण्यासाठी पश्चिम भारताचे प्रवेशद्वार असलेल्या मुंबईला भेट दिली. ही भारत भेट आर्थिक सहकार्य, व्यापार व गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने आहे असे प्रतिपादन म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष उ मिन आँग लॉन्ग यांनी येथे केले.
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष व त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ लोकभवन येथे स्वागत समारोहाचे आयोजन केले होते, त्यापूर्वी झालेल्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष उ मिन आँग लॉन्ग बोलत होते.
म्यानमार - भारत देशांमध्ये १६०० किमी लांब सीमा असून उभय देशांमध्ये मोठी सागरी सीमा देखील आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापार व परस्पर सहकार्य वाढविण्यास भरपूर वाव आहे. या दृष्टीने आपण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुंबईला आल्यावर येथील भव्य जवाहरलाल नेहरू बंदराला भेट दिली व व्यापार परिषदेत सहभागी झालो असे राष्ट्राध्यक्षांनी सांगितले.
म्यानमारमध्ये गेल्यावर्षी झालेल्या भीषण भूकंपानंतर मदत आणि बचावकार्य करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा मोहीम राबवून वैद्यकीय पथके, तात्पुरते हॉस्पिटल, अत्यावश्यक मदतसामग्री तसेच मानवतावादी मदत पाठविल्याचा राष्ट्राध्यक्षांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.
कोविड काळात देखील भारताने लस, ऑक्सिजन सिलिंडर्स व अन्नसामग्री पुरवल्याबद्दल म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांनी भारत तसेच येथील जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
भगवान बुद्ध उभय देशांना जोडणारा अध्यात्मिक दुवा : राज्यपाल
भगवान बुद्ध हे भारत व म्यानमार या देशांना जोडणारा अध्यात्मिक दुवा आहे. विपश्यना पद्धत भारतात नामशेष होत असताना म्यानमारने ती जपून ठेवली व आज विपश्यनेचा लाभ जगाला होत आहे असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी नमूद केले.
भगवान बुद्धांशी संबंधित विविध स्थळांना जोडणारे भारतातील बुद्धिस्ट सर्किट उभय देशांमधील पर्यटनाला चालना देईल असे राज्यपालांनी सांगितले.
भारताच्या 'शेजार प्रथम' (Neighbourhood First) आणि ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणांमध्ये म्यानमारला विशेष स्थान आहे, असे सांगून म्यानमार हा भारतासाठी आग्नेय आशिया आणि आसियान (ASEAN) देशांकरिता प्रवेशद्वार आहे असे राज्यपालांनी सांगितले. म्यानमार राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीमुळे उभय देशांमधील संबंधांना मोठी चालना मिळेल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
बैठकीला म्यानमार राष्ट्रपती कार्यालयाचे केंद्रीय मंत्री खिन माउंग यी, परराष्ट्र व्यवहार मंत्री टिन माउंग स्वे, संरक्षण दलातील लेफ्टनंट जनरल मो म्यिंट स्वे, भारताचे म्यानमारमधील राजदूत तसेच आणि म्यानमारचे भारतातील राजदूत उपस्थित होते.राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे देखील यावेळी उपस्थित होते.
बैठकीनंतर झालेल्या स्नेहभोजनाला राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, भारताचे म्यानमारमधील राजदूत - अभय ठाकूर, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती , मरिटाईम एअर ऑपरेशन्सचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर व्हाइस मार्शल प्रशांत वडोदकर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर