
नवी दिल्ली, 03 जून (हिं.स.)भारताने युगांडामधील इबोला विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी आपत्कालीन वैद्यकीय मदत पाठवली. ही मदत भारतीय हवाई दलाच्या सी-१७ ग्लोबमास्टर-III विमानाद्वारे युगांडाला पोहोचवण्यात आली.
भारतीय हवाई दलाने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या मोहिमेची घोषणा केली. हवाई दलाने म्हटले आहे की, ही मोहीम मानवतावादी संकटांच्या काळात जलद मदत पुरवण्याची भारताची क्षमता दर्शवते. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, आफ्रिकन युनियन कमिशनच्या विनंतीनुसार ही मदत 'आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन' (आफ्रिका सीडीसी) ला देण्यात आली. आफ्रिकेतील बाधित भागांमध्ये इबोला नियंत्रणाचे प्रयत्न अधिक मजबूत करणे, हा या मदतीचा उद्देश आहे.
सुमारे २.५ टन वैद्यकीय साहित्याची पहिली खेप २४ मे रोजी युगांडाची राजधानी कंपाला येथे पाठवण्यात आली. यामध्ये संरक्षक उपकरणे, आरोग्य देखरेख उपकरणे, अत्यावश्यक औषधे आणि पौष्टिक साहित्याचा समावेश होता. आफ्रिका सीडीसीकडून साहित्याची यादी मिळाल्यानंतर, भारताने सुमारे ४३ टन वैद्यकीय साहित्याची दुसरी, मोठी खेप तयार केली.
दुसऱ्या खेपमध्ये संरक्षक उपकरणे, चाचणी आणि देखरेख उपकरणे, नमुना वाहतूक किट, संसर्ग प्रतिबंधक साहित्य, औषधे आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा समावेश आहे. ही खेप २ जून रोजी कम्पाला येथे दाखल झाली असून ती आफ्रिका सीडीसीकडे सुपूर्द केली जाईल. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ही मदत आफ्रिकन देशांसोबत भारताची मजबूत भागीदारी आणि सहकार्याची भावना दर्शवते. सार्वजनिक आरोग्य आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारत आफ्रिकन देशांना पाठिंबा देत राहील.
अदिस अबाबा आणि कम्पाला येथील भारतीय दूतावास आफ्रिकन युनियन कमिशन आणि आफ्रिका सीडीसीच्या सतत संपर्कात आहेत. सोमवारी सकाळी, आफ्रिका सीडीसीने भारताने पाठवलेल्या वैद्यकीय मदतीचे स्वागत केले. संस्थेने म्हटले आहे की, या मदतीमुळे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या (डीआरसी) पूर्व भागांमध्ये सुरू असलेल्या इबोला नियंत्रण मोहिमेला बळकटी मिळेल.
आफ्रिका सीडीसीने भारत सरकार आणि भारतीय नागरिकांचे आभार मानले. संस्थेने म्हटले आहे की, ही मदत आफ्रिकेप्रती भारताची एकता आणि मानवतावादी वचनबद्धता दर्शवते. आफ्रिकन युनियनची सार्वजनिक आरोग्य संस्था म्हणून, आफ्रिका सीडीसी संपूर्ण खंडात रोग नियंत्रण आणि आपत्कालीन आरोग्य प्रतिसादाचे समन्वय साधते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे