'इन्शुरन्स फॉर ऑल'ला कॉमिक्सची साथ
मुंबई, 30 जून (हिं.स.)। राष्ट्रीय विमा जागृती दिनानिमित्त ‘इन्शुरन्स फॉर ऑल’ या संकल्पनेला अधिक बळ देण्यासाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय)चे अध्यक्ष अजय सेठ यांच्या हस्ते ग्राहक जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या कॉमिक बुक मालि
Comics Boost the Insurance for All Initiative


मुंबई, 30 जून (हिं.स.)। राष्ट्रीय विमा जागृती दिनानिमित्त ‘इन्शुरन्स फॉर ऑल’ या संकल्पनेला अधिक बळ देण्यासाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय)चे अध्यक्ष अजय सेठ यांच्या हस्ते ग्राहक जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या कॉमिक बुक मालिकेचे प्रकाशन करण्यात आले. जीवन विम्याशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पना सर्वसामान्य नागरिकांना सोप्या आणि रंजक पद्धतीने समजावून सांगून विम्याबाबत जागरूकता वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या कॉमिक मालिकेत विवाहित महिलांचा मालमत्ता हक्क कायदा (एमडब्ल्यूपी), वेव्हर ऑफ प्रीमियम (डब्ल्यूओपी) आणि क्रिटिकल इलनेस रायडर्स यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. तांत्रिक भाषेऐवजी दैनंदिन जीवनातील प्रसंग आणि कथांच्या माध्यमातून या संकल्पना मांडण्यात आल्या आहेत. सुप्रिया या तरुण जीवन विमा सल्लागाराच्या अनुभवांवर आधारित कथा आर्थिक नियोजन, भविष्याची तयारी आणि जीवन विम्याचे महत्त्व प्रभावीपणे स्पष्ट करतात.

कॉमिक बुक मालिकेच्या प्रकाशनावेळी आयएसी-लाईफचे अध्यक्ष कमलेश राव यांनी प्रत्येक भारतीय कुटुंबाच्या आर्थिक नियोजनात जीवन विमा हा अविभाज्य घटक बनणे आवश्यक असल्याचे सांगितले. ‘इन्शुरन्स फॉर ऑल’ ही केवळ विमाधारकांची संख्या वाढविण्याची मोहीम नसून प्रत्येक कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळवून देण्याचे व्यापक उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जीवन विमा हा कुटुंबांना आर्थिक आत्मविश्वास देणारा आणि भविष्यातील अनिश्चित परिस्थितींचा सामना करण्यासाठी सक्षम करणारा महत्त्वाचा आधार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

लाईफ इन्शुरन्स कौन्सिलचे महासचिव आदित्य गुप्ता यांनी जीवन विमा हा व्यक्ती आणि कुटुंबांसाठी सुरक्षित भविष्याचे आश्वासन असल्याचे सांगितले. ग्राहकांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी कथाकथनाच्या माध्यमाचा वापर करण्यात आला असून त्यामुळे विम्याविषयीची भीती आणि गुंतागुंत कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात ‘इंडिया आस्क्स : व्हाय प्रायोरिटाइज लाईफ इन्शुरन्स?’ या विषयावर परिसंवादही आयोजित करण्यात आला. त्यात विमा क्षेत्रातील तज्ज्ञांनी आर्थिक सुरक्षितता, विमा जागरूकता आणि संरक्षणात्मक उपायांचा व्यापक स्वीकार यावर सविस्तर चर्चा केली. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये नव्या व्यवसायातील प्रीमियममध्ये १५.७ टक्के वाढ होऊन २.८३ कोटींहून अधिक जीवन विमा पॉलिसी जारी झाल्या असल्या तरी देशातील अनेक कुटुंबे अजूनही पुरेशा आर्थिक संरक्षणापासून वंचित असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. त्यामुळे जनजागृती, आर्थिक साक्षरता आणि विश्वास वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही मान्यवरांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande