उच्च रक्तदाबावर नियंत्रणासाठी कमी सोडियमयुक्त मिठ उपयुक्त ; तज्ज्ञांचा सल्ला
नागपूर, 30 जून (हिं.स.) : भारतात हृदयविकार आणि उच्च रक्तदाब ही सार्वजनिक आरोग्यासमोरील गंभीर आव्हाने बनली असून, वाढते सोडियम सेवन ही त्यामागील प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आहारात कमी सोडियमयुक्त मिठाचा समावेश
टाटा लो-सोडियम मीठ लोगो


नागपूर, 30 जून (हिं.स.) : भारतात हृदयविकार आणि उच्च रक्तदाब ही सार्वजनिक आरोग्यासमोरील गंभीर आव्हाने बनली असून, वाढते सोडियम सेवन ही त्यामागील प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आहारात कमी सोडियमयुक्त मिठाचा समावेश करण्यासह संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

राष्ट्रीय कुटुंबकल्याण सर्वेक्षण-५ (२०२१)नुसार, भारतातील सुमारे २१.३ टक्के प्रौढ व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. ६० वर्षांवरील नागरिकांमध्ये हे प्रमाण जवळपास ४८ टक्क्यांपर्यंत पोहोचते. उच्च रक्तदाबाची सुरुवातीची लक्षणे बहुतांश वेळा जाणवत नसल्याने त्याला ‘सायलेंट किलर’ असेही संबोधले जाते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, सोडियमच्या अतिसेवनामुळे दरवर्षी जगभरात सुमारे १८.९ लाख मृत्यू होतात. प्रौढ व्यक्तीने दिवसाला ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ (सुमारे २,००० मिलिग्रॅम सोडियम) सेवन करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, भारतात दररोजचे सरासरी मिठाचे सेवन ८ ते ११ ग्रॅम असल्याचे विविध अहवालांत नमूद करण्यात आले आहे.

भारतीय आहारात स्वयंपाकातील मिठासोबतच प्रक्रिया केलेल्या (प्रोसेस्ड) अन्नपदार्थांमधूनही मोठ्या प्रमाणात सोडियम शरीरात जात असल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

यावर उपाय म्हणून कमी सोडियमयुक्त मिठाचा वापर करण्याचा पर्याय पुढे येत आहे. ‘टाटा सॉल्ट लाइट’सारख्या उत्पादनांमध्ये सामान्य मिठाच्या तुलनेत सुमारे १५ टक्के कमी सोडियम असल्याने चवीत फारसा फरक न पडता दैनंदिन सोडियमचे सेवन कमी करण्यास मदत होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटना तसेच ‘एम्स’मधील तज्ज्ञांनीही योग्य पद्धतीने कमी सोडियमयुक्त मीठ वापरणे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते, असे म्हटले आहे.

तथापि, मूत्रपिंडाचे आजार असलेल्या किंवा काही विशिष्ट औषधे घेणाऱ्या रुग्णांनी आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असा सल्लाही देण्यात आला आहे.

तज्ज्ञांच्या मते, केवळ मीठ बदलणे पुरेसे नाही. ताज्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करणे, प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन कमी करणे, मिठाऐवजी औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करून चव वाढवणे तसेच अन्नातील लपलेल्या सोडियमच्या स्रोतांकडे लक्ष देणे या सवयीही निरोगी जीवनशैलीसाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

योग्य आहारनियोजन, नियमित व्यायाम आणि सोडियमचे नियंत्रित सेवन यांसारख्या छोट्या पण सातत्यपूर्ण बदलांमुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होण्यास मदत होऊन दीर्घकालीन आरोग्य सुधारण्यास हातभार लागू शकतो, असे तज्ज्ञांनी नमूद केले.------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande