
लंडन , 30 जून (हिं.स.)। गेल्या आठवडाभरापासून अनेक युरोपीय देश विक्रमी उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहेत. या भीषण उष्णतेमुळे संपूर्ण युरोपमध्ये शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला असून जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. तसेच जंगलातील वणव्यांच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. या तीव्र उष्णतेचा परिणाम केवळ नागरिकांच्या आरोग्यावरच होत नसून अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधांवरही गंभीर परिणाम दिसून येत आहेत.
हवामान तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, पुढील आठवड्याच्या सुरुवातीपासून फ्रान्स आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये, जिथे मागील काही दिवसांत उष्णतेचा सर्वाधिक फटका बसला होता, तेथे तापमान पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या विक्रमी उष्णतेच्या लाटेने आता इटली आणि बाल्कन देशांनाही आपल्या विळख्यात घेतले आहे. उत्तर इटलीतील बोल्झानोपासून दक्षिणेकडील सिसिली बेटावरील पालेर्मोपर्यंत एकूण २२ शहरांमध्ये ‘रेड हीट वॉर्निंग’ म्हणजेच भीषण उष्णतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
या तीव्र उष्णतेचा परिणाम व्हॅटिकन सिटीमध्येही स्पष्टपणे दिसून आला. ‘सेंट्स पीटर अँड पॉल’ या सणानिमित्त पोप लिओ यांचा पारंपरिक ‘अँजेलस’ संदेश ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी भाविक छत्र्या आणि हातपंख्यांचा वापर करताना दिसून आले. दरम्यान, हवामान विभागाने क्रोएशियाची राजधानी झाग्रेब तसेच पर्यटकांचे आवडते स्प्लिट आणि डुब्रोव्हनिकसह अनेक भागांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.स्प्लिटपासून सुमारे ५५ किलोमीटर अंतरावर ॲड्रियाटिक समुद्रातील ‘व्हिस’ बेटावरील पाइनच्या जंगलात भीषण वणवा लागला. आग आटोक्यात आणण्यासाठी डझनभर अग्निशमन कर्मचारी आणि चार अग्निशमन विमाने तैनात करण्यात आली.
शास्त्रज्ञांच्या मते, २० जूनपासून सुरू झालेली ही उष्णतेची लाट युरोपच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात तीव्र उष्णतेच्या लाटांपैकी एक आहे. या उष्णतेमुळे वीज निर्मितीवर परिणाम झाला असून पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. तसेच आरोग्य व्यवस्थेवरही प्रचंड ताण निर्माण झाला आहे.फ्रान्समध्ये या उष्णतेच्या लाटेदरम्यान सुमारे १,००० अतिरिक्त मृत्यू नोंदवले गेले आहेत.
इटालियन हवामानशास्त्र सोसायटीचे अध्यक्ष लुका मर्काली यांनी सांगितले की, ५ ते ६ जुलैपासून तापमान पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी म्हटले की, “पहिल्या उष्णतेच्या लाटेप्रमाणेच यावेळीही फ्रान्स, स्पेन, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड आणि काही प्रमाणात ब्रिटन या देशांवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.”ते पुढे म्हणाले, “भीषण उष्णतेमुळे जंगलातील वणव्यांचा धोका वाढतो. मात्र, काही भागांत मुसळधार पाऊस आणि वादळांचीही शक्यता नाकारता येत नाही.”
दरम्यान, तीव्र उष्णतेमुळे पश्चिम युरोपमधील रेल्वे व्यवस्था विस्कळीत झाली असून अनेक मार्गांवरील सेवा प्रभावित झाल्या आहेत. फ्रान्समध्ये अनेक अणुभट्ट्या बंद करण्यात आल्या आहेत किंवा त्यांची उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली आहे. जर्मनीतील विमा कंपनी अलियान्झच्या अहवालानुसार, उष्णतेमुळे इटली, फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन या देशांना सर्वाधिक आर्थिक फटका बसला आहे. वाढत्या तापमानामुळे फ्रान्समधील चार अणुऊर्जा प्रकल्पांतील अणुभट्ट्या बंद कराव्या लागल्या आहेत.युरोपमधील वाढत्या उष्णतेमुळे जर्मनी, स्वित्झर्लंड आणि ब्रिटनमध्ये अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही देशांमध्ये रेल्वेच्या ऑनबोर्ड प्रणाली तीव्र उष्णता सहन करू न शकल्याने सेवांवर परिणाम झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode