
कीव, 30 जून (हिं.स.)। युक्रेनमध्ये सोमवारी रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे मोठी जीवितहानी झाली. या हल्ल्यांत १२ जणांचा मृत्यू, तर ४० जण जखमी झाले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध करत त्यांना “भीषण” असे संबोधले. चार वर्षांपूर्वी रशियाने युक्रेनवर युद्ध छेडले असून, संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार या युद्धात आतापर्यंत १६ हजारांहून अधिक युक्रेनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशिया सातत्याने युक्रेनच्या पायाभूत सुविधांवर हल्ले करून नागरिकांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करत आहे.
द्निप्रो शहरात रशियन क्षेपणास्त्राने पायाभूत सुविधांना लक्ष्य केले. या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू, तर २९ जण जखमी झाले. झापोरिझ्झिया शहरात रशियन ड्रोन एका प्रवासी बसवर आदळल्याने एका लहान मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. सुमी प्रदेशातील ड्रोन हल्ल्यांत एका वृद्ध महिलेचा आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. खार्किव्ह शहराचे महापौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसा झालेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाले. याशिवाय युक्रेनमधील आणखी सहा भागांतही प्राणघातक हल्ले करण्यात आले.
रशियाच्या या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील आठ प्रदेशांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. तीव्र उष्णतेमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर वातानुकूलित यंत्रांचा (एअर कंडिशनर) वापर करत असल्याने विजेची मागणीही प्रचंड वाढली आहे.राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा युरोपीय देशांना आवाहन करत, रशियाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी युरोपने आपली हवाई संरक्षण व्यवस्था आणि क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा अधिक सक्षम करावी, असे म्हटले. नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी अत्याधुनिक अँटी-बॅलिस्टिक संरक्षण प्रणालीची नितांत गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांत युद्धाचे स्वरूपही बदलले आहे. युक्रेनने रशियातील तेलसाठे आणि इंधन केंद्रांवर ड्रोन हल्ले अधिक तीव्र केले आहेत. या हल्ल्यांमुळे रशिया आणि त्याच्या ताब्यातील भागांमध्ये इंधनटंचाई निर्माण झाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी प्रथमच मान्य केले की, युक्रेनच्या हल्ल्यांमुळे देशात इंधन संकट निर्माण झाले आहे. अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.तथापि, पुतिन यांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. रशिया हे युद्ध अखेरीस जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनीही रशियाचे युद्धातील उद्दिष्ट बदलले नसून, रशियन सैन्याची मोहीम पुढे सुरूच राहील, असे स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode