अणुकराराबाबतच्या चर्चेसाठी अमेरिकेचे दूत स्टीव्ह विटकॉफ कतारला रवाना
वॉशिंग्टन , 30 जून (हिं.स.)।अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ हे इराणसोबतच्या चर्चेसाठी कतारची राजधानी दोहा येथे रवाना झाले आहेत. अमेरिका आणि इराण यांनी नुकतीच एकमेकांवर हल्ला न करण्याबाबत सहमती दर्शवल्यानंतर विटकॉफ यांचा हा दौरा होत आहे. वृत्तानु
अणुकराराबाबतच्या चर्चेसाठी अमेरिकेचे दूत स्टीव्ह विटकॉफ कतारला रवाना


वॉशिंग्टन , 30 जून (हिं.स.)।अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ हे इराणसोबतच्या चर्चेसाठी कतारची राजधानी दोहा येथे रवाना झाले आहेत. अमेरिका आणि इराण यांनी नुकतीच एकमेकांवर हल्ला न करण्याबाबत सहमती दर्शवल्यानंतर विटकॉफ यांचा हा दौरा होत आहे. वृत्तानुसार, विटकॉफ दोहा येथे इराणच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. मात्र, या दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर त्यांच्यासोबत आहेत की नाहीत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की, मंगळवारी दोहा येथे होणारी राजनैतिक बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, इराणकडे अण्वस्त्रे असू नयेत, या भूमिकेवर अमेरिका ठाम आहे. ट्रम्प म्हणाले, “उद्या दोहा येथे बैठक होणार आहे. त्यातून काय निष्पन्न होते ते पाहू. ही बैठक महत्त्वाचीही आहे आणि नाहीही. मात्र, एक गोष्ट स्पष्ट आहे की इराणने अण्वस्त्रांचा त्याग करायलाच हवा. आम्हाला इराणकडे अण्वस्त्रे नकोत आणि त्यासाठी तेही तयार आहेत.” यावेळी ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीही कमी झाल्याचा दावा केला.

एका बाजूला ट्रम्प दोहा बैठकीला महत्त्व देत असताना, दुसऱ्या बाजूला इराणने दोहा येथे कोणतीही औपचारिक चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने या आठवड्यात कोणत्याही तांत्रिक किंवा राजकीय चर्चेला स्पष्ट नकार दिला आहे. तथापि, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी इराणी शिष्टमंडळ दोहा दौऱ्यावर असल्याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, दोहा येथे केवळ विद्यमान करारातील कलम ११ संदर्भात चर्चा होणार आहे. तसेच, दोहा येथे येणाऱ्या अमेरिकी प्रतिनिधीमंडळाची इराणी शिष्टमंडळासोबत कोणतीही बैठक नियोजित नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी म्हटले की, “जर अमेरिका इराणवर हल्ला करणार नसेल, तर आम्हीही आमच्या वचनबद्धतेचा आदर करू.” मात्र, त्यांनी इशाराही दिला की, तेहरान कोणत्याही धमकीला ठामपणे उत्तर देईल.सोमवारी एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये पेजेशकियान यांनी लिहिले, “परस्पर समज ही द्विपक्षीय प्रक्रिया आहे. जर अमेरिकेने कराराचे पालन केले, तर आम्हीही आमच्या सर्व वचनबद्धता पूर्ण करू.”

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता पेजेशकियान म्हणाले, “निरर्थक धमक्यांकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन विवेकबुद्धी आणि मानवी प्रतिष्ठेवर आधारित आहे. मात्र, कृतीची वेळ आली तर आम्ही कोणतीही भीती न बाळगता ठोस आणि निर्णायक पावले उचलू.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande