सबस्क्रिप्शनसाठी विनीत मोबाईलचा आयपीओ खुला; ७ जुलै रोजी लिस्टिंग अपेक्षित
नवी दिल्ली, 30 जून (हिं.स.)। मल्टी-ब्रँड मोबाईल रिटेल व्यवसायात कार्यरत असलेल्या विनीत मोबाईल लिमिटेडचा 34.13 कोटी रुपयांचा आयपीओ आज गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. या आयपीओसाठी 2 जुलैपर्यंत अर्ज करता येणार असून, शेअर्सचे वाटप 3 जुलै रोजी होण्याची
Vineet Mobile IPO Opens Subscription


नवी दिल्ली, 30 जून (हिं.स.)। मल्टी-ब्रँड मोबाईल रिटेल व्यवसायात कार्यरत असलेल्या विनीत मोबाईल लिमिटेडचा 34.13 कोटी रुपयांचा आयपीओ आज गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. या आयपीओसाठी 2 जुलैपर्यंत अर्ज करता येणार असून, शेअर्सचे वाटप 3 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 6 जुलै रोजी पात्र गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात शेअर्स जमा केले जातील आणि 7 जुलै रोजी कंपनीचे शेअर्स एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे. आयपीओच्या पहिल्याच दिवशी दुपारी 2.40 वाजेपर्यंत या इश्यूला केवळ 4 टक्के प्रतिसाद मिळाला होता.

या आयपीओसाठी प्रति शेअर 150 ते 158 रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. एका लॉटमध्ये 800 शेअर्स असून, किरकोळ गुंतवणूकदारांना किमान दोन लॉट म्हणजेच 1,600 शेअर्ससाठी अर्ज करावा लागणार आहे. यासाठी सुमारे 2.52 लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. कंपनी या इश्यूद्वारे दर्शनी मूल्य 10 रुपये असलेले एकूण 21.60 लाख नवीन इक्विटी शेअर्स जारी करणार आहे.

आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (क्यूआयबी) 1 टक्का हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 56 टक्के, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (एनआयआय) 38 टक्के आणि मार्केट मेकरसाठी 5 टक्के हिस्सा राखीव आहे. या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून कम्फर्ट सिक्युरिटीज लिमिटेडची नियुक्ती करण्यात आली असून, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही रजिस्ट्रारची जबाबदारी सांभाळणार आहे. कम्फर्ट सिक्युरिटीज हीच कंपनी या इश्यूची मार्केट मेकरदेखील आहे.

कंपनीने सेबीकडे सादर केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार तिच्या आर्थिक कामगिरीत सातत्याने सुधारणा झाली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीला 72 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तो 2024-25 मध्ये वाढून 3.90 कोटी रुपयांवर पोहोचला. तर 2025-26 या आर्थिक वर्षातील एप्रिल ते 31 डिसेंबर या पहिल्या नऊ महिन्यांतच कंपनीने 5.11 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. महसुलातही मोठी वाढ झाली असून, 2023-24 मध्ये 28.59 कोटी रुपये असलेला महसूल 2024-25 मध्ये 60.63 कोटी रुपयांवर पोहोचला. 2025-26 च्या पहिल्या नऊ महिन्यांत कंपनीने 56.01 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.

कंपनीच्या कर्जात मात्र चढ-उतार दिसून आला. 2023-24 अखेरीस 3.10 कोटी रुपयांचे कर्ज असलेल्या कंपनीचे कर्ज 2024-25 मध्ये 3.04 कोटी रुपयांवर आले होते. मात्र 2025-26 च्या पहिल्या नऊ महिन्यांत ते वाढून 6.07 कोटी रुपयांवर गेले. दुसरीकडे कंपनीचा रिझर्व्ह आणि सरप्लस, नेटवर्थ तसेच ईबीआयटीडीएमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत होत असल्याचे चित्र समोर आले असून, या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांचा पुढील प्रतिसाद आणि सूचीबद्धतेनंतरच्या कामगिरीकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande