बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला फाशी; ऐतिहासिक निकाल
जळगाव, 04 जून (हिं.स.)जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या अत्यंत भीषण आणि राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या चौघांच्या हत्याकांड प्रकरणात भुसावळ जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला फाशीची शि
कोर्ट लोगो


जळगाव, 04 जून (हिं.स.)जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या अत्यंत भीषण आणि राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या चौघांच्या हत्याकांड प्रकरणात भुसावळ जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

15 ऑक्टोबर 2020 रोजी मध्यरात्री आरोपी महेंद्र बारेला याने बोरखेडा शिवारात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिच्यासह तिच्या तीन भावंडांची निर्घृण हत्या केली होती. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्याचे निर्देश दिले होते. तसेच सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. या खटल्यादरम्यान एकूण 27 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पोलिसांनी सादर केलेले भक्कम पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि सरकारी पक्षाचा प्रभावी युक्तिवाद याच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली.

दरम्यान, फाशीच्या शिक्षेला कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी संपूर्ण खटल्याचा अहवाल उच्च न्यायालयाकडे सादर केला जाणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी दिली. उच्च न्यायालयाकडून या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, समाजात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्यांना कठोर संदेश मिळाल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande