
रायगड, 04 जून (हिं.स.) : कर्जत तालुक्यातील कुरुंग (पोस्ट बोरगाव) येथे जंगलातील प्राण्यांच्या शिकारीदरम्यान झालेल्या निष्काळजी गोळीबारात एका लहान मुलाला दुखापत झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कुरुंग गावातील महिला फिर्यादी आपल्या घराबाहेर कपडे धूत होत्या. त्यावेळी त्यांचा मुलगा घरासमोरील मोकळ्या जागेत एकटाच खेळत होता. दरम्यान, जंगलातील प्राण्यांची शिकार करत असलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याच्या ताब्यातील बंदुकीतून निष्काळजीपणे गोळीबार केला.
गोळीबारातून उडालेले छरे मुलाच्या दोन्ही मांड्या, हात आणि चेहऱ्यावर लागल्याने तो जखमी झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी मुलाला तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १२५, १२५(अ) तसेच शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काजरोळकर करीत असून, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. जंगल परिसरात बेकायदा शिकारीचे प्रकार सुरू असल्याची शक्यता व्यक्त होत असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)