यूएन सुरक्षा परिषदेसाठी पाच नव्या अस्थायी सदस्यांची निवड; भारताकडून अभिनंदन
नवी दिल्ली , 04 जून (हिं.स.)।संयुक्त राष्ट्र महासभेने ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्तुगाल, त्रिनिदाद आणि टोबॅगो तसेच झिम्बाब्वे यांची 2027-28 या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी)च्या अस्थायी सदस्यपदी निवड केली आहे. भारताने या देशां
यूएन सुरक्षा परिषदेसाठी पाच नव्या अस्थायी सदस्यांची निवड; भारताकडून अभिनंदन


नवी दिल्ली , 04 जून (हिं.स.)।संयुक्त राष्ट्र महासभेने ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्तुगाल, त्रिनिदाद आणि टोबॅगो तसेच झिम्बाब्वे यांची 2027-28 या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी)च्या अस्थायी सदस्यपदी निवड केली आहे. भारताने या देशांचे अभिनंदन करत भविष्यात त्यांच्यासोबत घनिष्ठ सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.बुधवारी उशिरा झालेल्या निवडणुकीत 193 सदस्यीय महासभेने पाच नवीन अस्थायी सदस्यांची निवड केली. हे देश 2026 च्या अखेरीस डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया यांची जागा घेतील.

संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी. हरीश यांनी एक्सवरील अधिकृत संदेशात नव्याने निवडून आलेल्या सदस्य राष्ट्रांचे हार्दिक अभिनंदन केले. भारत या देशांसोबत काम करण्यास उत्सुक असून परस्पर सहकार्य अधिक बळकट करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले.

गुप्त मतदानाद्वारे निवडलेल्या या देशांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2027 ते 31 डिसेंबर 2028 असा असेल.पश्चिम युरोप आणि इतर राष्ट्रांच्या गटात जर्मनीला मोठा धक्का बसला. या निवडणुकीत जर्मनीला 104 मते मिळाली, तर पोर्तुगालला 134 आणि ऑस्ट्रियाला 131 मते मिळाली. निकालांची घोषणा संयुक्त राष्ट्र महासभेच्या (यूएनजीए) अध्यक्षा आणि जर्मनीच्या माजी परराष्ट्र मंत्री अनालेना बेअरबॉक यांनी केली.

जर्मनीचे परराष्ट्र मंत्री योहान वाडेफुल यांनी या निकालाला “खऱ्या अर्थाने निराशाजनक” असे संबोधले. त्यांनी सांगितले की, जर्मनीने निवडणुकीत उशिरा सहभाग घेतल्यामुळे त्याचा फटका बसला. तसेच युक्रेनला दिलेला पाठिंबा आणि इस्रायलविषयी जर्मनीची स्पष्ट भूमिका हे देखील पराभवाचे कारण ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

आफ्रिका आणि आशिया-प्रशांत गटातील दोन जागांसाठी झिम्बाब्वेला 182 मते मिळाली, तर किर्गिस्तानला 142 मते मिळाली. किर्गिस्तान प्रथमच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रवेश करणार आहे. त्याने फिलिपिन्सचा 142 विरुद्ध 49 मतांनी पराभव केला.लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन राष्ट्रांच्या गटात त्रिनिदाद आणि टोबॅगोला 181 मते मिळाली.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एकूण 15 सदस्य असतात. त्यापैकी चीन, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंगडम आणि अमेरिका हे पाच स्थायी सदस्य आहेत. नवीन निवडून आलेले सदस्य पुढील वर्षी पी-5 देशांसोबत बहरेन, कोलंबिया, काँगो लोकशाही प्रजासत्ताक, लाटव्हिया आणि लाइबेरिया या देशांसह परिषदेत सहभागी होतील. या देशांचा कार्यकाळ 2027 च्या अखेरीस संपणार आहे.

भारताने 2021-22 दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून काम केले होते. पुढील वेळी भारताला 2028-29 या कालावधीसाठी सदस्यत्व मिळण्याची शक्यता आहे. यासाठी भारताने आपली उमेदवारी आधीच जाहीर केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande