
वॉशिंग्टन , 04 जून (हिं.स.)।अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी बुधवारी पुन्हा एकदा दावा केला की, इराणसोबतचे युद्ध संपुष्टात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात प्राणघातक हल्ल्यांची मालिका अद्याप सुरूच आहे. हाऊस फॉरेन अफेअर्स कमिटीसमोर बोलताना रुबिओ यांनी अमेरिका या संघर्षात विजयी ठरल्याचा दावा केला.
रुबिओ म्हणाले, “इराणच्या लष्करी क्षमतेला कमकुवत करण्यासाठी आम्ही आता सातत्याने हल्ले करत नाही, कारण ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ आता संपले आहे.” अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईला ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ असे नाव देण्यात आले आहे. २८ फेब्रुवारी रोजी इराणवर झालेल्या पहिल्या हल्ल्यानंतर हा संघर्ष संपूर्ण पश्चिम आशियात पसरला आहे. इराणने या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून या प्रदेशातील अमेरिकेच्या मित्रदेशांना लक्ष्य केले असून होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतुकीत प्रभावी अडथळे निर्माण केले आहेत.
रुबिओ म्हणाले, “आमच्या मते विजय म्हणजे त्यांच्या संरक्षण उद्योगाचा पाया उद्ध्वस्त करणे, त्यांच्याकडे असलेल्या क्षेपणास्त्र प्रक्षेपकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करणे आणि त्यांच्या ड्रोन साठ्यावर मोठा परिणाम करणे. आणि आम्ही हे सर्व साध्य केले आहे.”ते पुढे म्हणाले, “याशिवाय आम्ही त्यांच्या उरलेल्या हवाई दलालाही निष्प्रभ केले असून त्यांच्या पारंपरिक नौदलाचाही पूर्णपणे नाश केला आहे.”
रुबिओ यांच्या दाव्यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी तीव्र विरोध केला. संघर्ष अद्याप सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. बुधवारी इराणने कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर ६३ जण जखमी झाले. कुवेतप्रमाणेच बहरीनमध्येही अमेरिकन लष्कराची मोठी उपस्थिती आहे. तेथेही रात्रीच्या वेळी इराणकडून ड्रोन हल्ले करण्यात आल्याचे वृत्त आहे.
इराणसोबत सुरू असलेल्या चर्चेबाबत माहिती देताना रुबिओ यांनी सांगितले की, इराणच्या उच्च संवर्धित युरेनियम साठ्याचा मुद्दा हा चर्चेचा केंद्रबिंदू आहे. मात्र, तेहरानने अद्याप कोणत्याही शांतता कराराला संमती दिलेली नाही. रुबिओ यांनी समितीला सांगितले की, माझ्या मते, दोन्ही बाजूंमध्ये देवाणघेवाण झालेल्या काही दस्तऐवजांमध्ये या मुद्द्याचा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, आज सकाळपर्यंतही आम्हाला इराणच्या यंत्रणेकडून अंतिम मंजुरी मिळालेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode